तेजपूर : मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी शनिवारी चुराचंदपूर येथील मदत शिबिरांना भेट दिली. हे शिबिर मणिपूरमधील संघर्षाचे केंद्र आहे. येथे त्यांनी पीडित लोकांची भेट घेऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, सध्या विरोधी पक्षांचे 21 सदस्यीय शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर आहे. अशा वेळेस राज्यपालांची मदत शिबिरांना भेट महत्वाची मानली जात आहे. भेटीदरम्यान, राज्यपालांनी नग्न धिंड काढण्यात आलेल्य दोन महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला.
मदत शिबिरांची पाहणी केली : राज्यपाल उईके यांनी प्रथम सेंट पॉल इन्स्टिट्यूटच्या मदत शिबिरात भेट दिली. त्यानंतर त्या रेंगकाई येथील यंग लर्नर्स स्कूलमध्ये गेल्या. तेथे सुमारे 160 - 170 स्थलांतरित आश्रयास आहेत. भेटीदरम्यान राज्यपालांनी स्थलांतरित राहत असलेल्या मदत शिबिरांची पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला स्वच्छता किट, लहान मुलांना खाण्यायोग्य वस्तू आणि काही रोख रकमेसह मदत सामग्रीचे वाटप केले.
युवकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन : यावेळी राज्यपालांनी युवकांना कायदा हातात न घेण्याचे आणि बेकायदेशीर कामांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. मी पीडित लोकांना सहानुभूती देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी शिबिरांना भेट देत असल्याचे उईके यांनी सांगितले. सरकार बाधित लोकांना नुकसानभरपाई देईल. तसेच राज्यात शांतता पुन्हा स्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
माजी सैनिकांच्या कुटुंबियांना मदत : राज्यपालांनी तुयबोंग येथे माजी सैनिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. राज्य सैनिक मंडळाचे अध्यक्ष या नात्याने राज्यपालांनी सात माजी सैनिकांच्या कुटुंबियांना 15 हजार रुपयांची रोख रक्कम व काही मदती सामग्री दिली. मी लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आल्याचे उईके यांनी सांगितले. आतापर्यंत काही समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या नाकाबंदीमुळे औषधाची वाहतूक करणे अवघड असल्याने मच्छरदाणी, ताडपत्री, स्वच्छता किट आणि अन्य काही पुरवठा व इतर मदत साहित्य आणल्याचे त्या म्हणाल्या.
'त्या' दोन महिलांचीही भेट घेतली : राज्यपाल त्या दोन महिलांनाही भेटल्या ज्यांची जमावाने नग्न धिंड काढली होती. राज्यपालांनी त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. 'या घटनेमुळे संपूर्ण देश लाजला आहे, असे त्या म्हणाल्या. या महिलांना आवश्यक आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले जाईल', असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा :
- Manipur Violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओची होणार सीबीआय चौकशी, एफआयआर नोंदवला
- INDIA Parties MPs Manipur visit: विरोधी आघाडीचा मणिपूर दौरा; 'इंडिया'चे 21 खासदार मणिपूरसाठी रवाना
- Monsoon Session 2023 : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ब्लॅक डे'; मणिपूर हिंसाचाराच्या निषेधासाठी 'इंडिया'चे खासदार काळे कपडे घालून संसदेत दाखल!