हैदराबाद Telangana Election 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं मोठा विजय मिळवला आहे. पक्षानं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या 'भारत राष्ट्र समिती'चा पराभव केला. या पराभवासह केसीआर यांचं सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भंग झालं.
तेलंगणातील विजयात माणिकरावांचे योगदान : तेलंगणातील विजय कॉंग्रेससाठी अत्यंत आवश्यक होता. उत्तर भारतात एकीकडे पानिपत होत असताना, दक्षिण भारतात मात्र पक्षानं लागोपाठ दोन राज्यं जिंकली. यावर्षी मे महिन्यात कॉंग्रेसनं कर्नाटकात भाजपाचा पराभव केला होता. आता तेलंगणात विजय मिळवत कॉंग्रेसनं दक्षिण भारतात आपला पाया आणखी मजबूत केला आहे. कॉंग्रेसच्या या विजयात एका मराठी माणसाची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली. ही व्यक्ती म्हणजे, तेलंगणा कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे!
तेलंगणाचे प्रभारी बनले : माणिकराव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते २००८ ते २०१५ दरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात पक्षानं २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद गेलं. माणिकराव ठाकरे गांधी कुटुंबियांच्या निकटचे मानले जातात. जानेवारी २०२३ मध्ये पक्षानं त्यांना तेलंगणाचे प्रभारी बनवून पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली.
ग्राउंड लेव्हलवर काम केलं : २०१३ मध्ये तेलंगणाची स्थापना झाल्यापासून तेथे के. चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. माणिकराव ठाकरे यांच्यासमोर केसीआर यांची ही १० वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचं आव्हान होतं. हे आव्हान त्यांनी लीलया पेललं. माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव तेलंगणात वापरला. त्यांनी ग्राउंड लेव्हलवर काम करत जनतेचा सरकारबद्दल असलेला रोष नेमका ओळखला. आता तेलंगणातील विजयानंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया दिली.
सर्व नेत्यांनी एकजूटता दाखवली : मला पक्षानं तेलंगणाची जबाबदारी दिली होती. मी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र घेऊन चाललो. तेलंगणातील कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकजूटता दाखवली. त्यांच्यामुळे हा विजय शक्य झाला, असं माणिकराव ठाकरे ईटीव्हीशी बोलताना म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनी कॉंग्रेस हाय कमांडचेही आभार मानले. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात जबाबदारी मिळेल का : यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कमबॅक करण्याबद्दल फारसं भाष्य केलं नाही. या विजयानंतर तुम्हाला महाराष्ट्रात पुन्हा मोठी जबाबदारी मिळेल का? असा प्रश्न विचारला असता, "या विजयाचा संबंध महाराष्ट्रातील जबाबदारीशी लावू नका", असं ते म्हणाले.
हेही वाचा :