कोलकाता : विधानसभा निवडणुकीतील तृणमूल काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर ममता बॅनर्जींनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममतांना गोपनीयतेची शपथ दिली. ममतांनी यावेळी बांग्ला भाषेमध्ये शपथ घेतली. या शपथ सोहळ्याला पार्थ चॅटर्जी आणि सुब्रत मुखर्जी हे तृणमूल नेते, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूलच्या विजयामध्ये मोठा वाटा असणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे उपस्थित होते.
बॅनर्जी म्हणाल्या, की मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम आपण कोरोना परिस्थित नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच, शपथग्रहणानंतर त्यांनी सर्व राजकीय पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी राज्यपाल म्हणाले, की आम्ही आता सर्वप्रथम निकालानंतर होत असलेला हिंसाचार थांबण्याला प्राधान्य देणार आहोत.
हेही वाचा : तुम्ही ज्याला 'मदत' म्हणत आहात; त्याला आम्ही 'मैत्री' म्हणतो - एस. जयशंकर