कोलकाता - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांमध्ये वाढ होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधन दरवाढीविरोधात अनोख्या रीतीने निषेध नोंदवला. ममता बॅनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर बसून राज्य सचिवालय 'नाबन्ना' येथे पोहचल्या. त्यांचे हे स्कूटर राज्य सरकारचे मंत्री आणि कोलकाता महापौर फिरहाद हकीम चालवत होते. मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसल्या होत्या.
पश्चिम बंगाल राज्यात पेट्रोल 100 रुपये लिटरच्या पुढे गेले आहे. याचा निषेध नोंदवत ममता बॅनर्जी यांनी हाजरा मोड ते राज्य सचिवालयदरम्यानचे पाच किलोमीटर ऐवढे अंतर इलेक्ट्रिक स्कूटरवर बसून पार केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले लोक मुख्यमंत्र्यांना अभिभावदन करताना पाहायला मिळाले. नियामानुसार दोघांनीही हेल्मेट घातले होते. पेट्रोल दरवाढ, डिझेलची दरवाढ आणि गॅसची दरवाढ' असे लिहिलेला एक फलकही दीदींनी आपल्या गळ्यात परिधान केला होता.
पश्चिम बंगालमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे भाजपा आणि तृणमूल काँग्रेस एकमेंकाविरोधात आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अटीतटीची लढाई बंगालमध्ये पाहायला मिळणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून विरोधी पक्षांकडून केंद्रावर टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इंधन दरवाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच सरकारने राजधर्माचे पालन करून इंधन दर कमी करावेत, असा सल्ला त्यांनी मोदींना दिला होता.