कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, तीन वर्षांपूर्वी त्यांनाही पेगासस या इस्रायली हेर सॉफ्टवेअरची सेवा घेण्याची विनंती करण्यात आली होती, परंतु त्यांनी नकार दिला ( Pegasus Offered To Mamata ) होता. ममता म्हणाल्या की, भाजपला या मशीनमध्ये विशेष रस आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची हेरगिरी करून त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे.
त्यावेळी आम्ही नकार दिला
ममता म्हणाल्या की, चार वर्षांपूर्वी काही लोकांनी आमच्या पोलिस खात्याशी संपर्क साधला होता. यामध्ये एनएसओ ग्रुपचा समावेश होता. ही इस्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनी आहे. ममताच्या म्हणण्यानुसार, या ग्रुपने 25 कोटींच्या बदल्यात मशीन देण्याचे आश्वासन दिले होते. या मशीनचा वापर न्यायाधीश, अधिकारी आणि राजकारण्यांच्या विरोधात केला जाऊ शकतो, त्यामुळे आम्ही ही सौदेबाजी होऊ दिली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातही पेगाससची खरेदी
चंद्राबाबू नायडू यांच्या काळात आंध्र प्रदेशात पेगासस खरेदी करण्यात आल्याचेही ममता म्हणाल्या. त्या मशीनमधून माझा फोन टॅप केला जात होता, असा दावा ममता यांनी विधानसभेत केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. यादरम्यान ममता यांनी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्यावर धमकी दिल्याचा आरोपही केला. ममता म्हणाल्या की, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ममतांच्या या वक्तव्यानंतर भाजप सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.