कोलकाता (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या पक्षाच्या आमदाराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे टीकेच्या धनी ठरल्या होत्या. ममता यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधक सातत्याने करत होते. त्यावरून चांगलाच गदारोळ सुरू झाला होता. दरम्यान, आज सोमवार (14 नोव्हेंबर)रोजी ममता बॅनर्जी यांनी अखिल गिरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल त्या म्हणाल्या की मुर्मू या खूप चांगल्या महिला आहेत. त्या खूप प्रेमळ आहेत. माझ्या आमदाराच्या वक्तव्याचा मी निषेध करते. तसेच, मी माफीही मागते असही त्या म्हणाल्या आहेत. अखिल गिरी यांनी नंदीग्राममधील एका सभेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते, 'आम्ही कोणाच्याही दिसण्यावरून न्याय करत नाही. आम्ही राष्ट्रपतींच्या खुर्चीचा आदर करतो, पण आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात?' अखिल गिरी यांचे हे विधान कॅमेऱ्यात कैद झाले जे नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
उच्च न्यायालयात जनहित याचिका - दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यमंत्री अखिल गिरी यांच्याविरोधात सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकेत अखिल गिरी यांना घटनेच्या सर्वोच्च पदाचा अनादर केल्याबद्दल शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण सोमवारी मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या खंडपीठात दाखल करण्यात आले आहे.
ममता यांनी केंद्रावर केली होती टीका - काही लोक सतत राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, 'जर एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली असेल, तर त्याला त्या चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे. जर कोणी भ्रष्टाचार केला तर कायदा स्वतःचा मार्ग स्वीकारेल. मात्र, मीडिया ट्रायल सुरू आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, 'काही लोक बंगालमध्ये बसून खात आहेत आणि षड्यंत्र रचत आहेत. हे लोक दिल्लीला सांगत आहेत की, बंगालला पैसे देऊ नका, मला दिल्लीचा पैसा नको आहे. बंगाल आपल्या पायावर उभा राहण्यास सक्षम आहे. आमचा स्वाभिमान आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, आम्ही दिल्लीला तो हिरावून घेऊ देणार नाही असही त्या म्हणाल्या आहेत.