इंदूर - मध्य प्रदेशात टँकर आणि कारच्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इंधन वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला उभा असताना अनियंत्रित कारने टँकरला जोरदार धडक दिली. इंदूर शहराच्या जवळच ही घटना घडली. सर्व विद्यार्थी १८ ते २८ वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे.
काल (सोमवार) रात्री उशिरा हा अपघात झाला. तलावली चांदा परिसरात एका पेट्रोल पंपाजवळ उभ्या टँकरला कारने जोरदार धडक दिली, अशी माहिती लसुडिया पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. कारमधील सहाही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. सर्वजण इंदूर येथील रहिवासी होते. मांगलिया परिसरातून इंदूर शहराकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी महाराजा यशवंतराव चिकित्सालय पाठवण्यात आले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
मध्य प्रदेशात सीधी जिल्ह्यात मागील आठवड्यात बसचा भीषण अपघात झाल्याने कालव्यात कोसळली. या अपघातात ५४ प्रवाशांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ५८ प्रवासी होते. अनियंत्रित झाल्याने बस कालव्यात कोसळली होती. कालव्यातून एकून ५४ मृतदेह बाहेर काढण्यात आले.