नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होण्यासाठी महाराष्ट्राला रेल्वेकडून मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामद्ये ५६ मेट्रिक टन द्रवरुपातील ऑक्सिजन (एलएओ) असणार आहे. ही ऑक्सिजन एक्सप्रेस ओडिशामधील अंगूल येथून नागपूरला पोहोचणार आहे.
राजस्थानला पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ही शुक्रवारी पोहोचली आहे. गुजरातमधील हापा येथून कोटाला ४० मेट्रिक टनचा ऑक्सिजन घेऊन ही एक्सप्रेस पोहोचली होती.
हेही वाचा-कळंबोली रेल्वे स्थानकात ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल
लवकरच महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीमध्ये २६० टनांहून अधिक ऑक्सिजन असलेले १८ टँकर दाखल होणार आहेत. त्यासाठी ही ऑक्सिजन एक्सप्रेस आज रात्री धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय रेल्वेने १८५ टँकरमधून विविध राज्यांना २९६० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविला आहे.
हेही वाचा-"ऑक्सिजन एक्सप्रेस" नंतर "मिल्क एक्सप्रेस", ४५ हजार लिटर दूध घेऊन नागपूर-दिल्ली ट्रेन रवाना
महाराष्ट्राला आजवर एकूण ७४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा-
रेल्वेच्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत महाराष्ट्रात आजवर एकूण १७४ मेट्रिक टन ऑक्सिजन, उत्तर प्रदेशमध्ये ७२९ मेट्रिक टन ऑक्सिजन, मध्यप्रदेशमध्ये २४९ मेट्रिक टन ऑक्सिजन, हरियाणामध्ये ३०५ मेट्रिक टन ऑक्सिजन, तेलांगाणामध्ये १२३ मेट्रिक टन ऑक्सिजन आणि दिल्लीमध्ये १३३४ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वेने तातडीने तयारी केली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे.