भोपाळ - मध्य प्रदेशात कोरोना संसर्गाची गती कमी होत आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण 5 टक्के आला तरच कोरोना कर्फ्यू राज्यातून संपुष्टात येईल, असे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते. मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण 7 ते 8 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. दररोज, नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही 31 मेपासून मध्य प्रदेश अनलॉक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे अनलॉक उज्जैनपासून सुरू होऊ शकते.
बुधवारी उज्जैन दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीला हजेरी लावली. या दरम्यान ते म्हणाले की, 31 मे पर्यंत कडक बंदोबस्त राहील. यानंतर 1 जूनपासून हळूहळू जिल्हे उघडले जातील. हा निर्णय फक्त उज्जैन विभागाचा आहे.
विवाह समारंभांना अनुमती -
कोरोना नियंत्रणात राहिला तर जूनमध्ये शहर उघडले जाईल. मर्यादित संख्येने विवाह समारंभांना अनुमती दिली जाईल, असे ते म्हणाले. तसेच तिसऱ्या लाटेची आतापासूनच तयारी करण्याचे त्यांनी निर्देश दिले. कोरोना अजून संपलेला नाही. कोरोना फ्री व्हिलेज, कोरोना फ्री वार्ड करायचे आहे. कोरोना कर्फ्यू 31 मे पर्यंत 11 दिवस काटेकोरपणे लागू केला जाईल.
ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर मोफत उपचार -
आढावा बैठकीसाठी उज्जैन येथे दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनीही ब्लॅक फंगसबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यात ब्लॅक फंगसच्या रुग्णांना सरकार मोफत उपचार देईल. राज्यात सुमारे 573 ब्लॅक फंगसचे रुग्ण आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक पोस्ट कोविड केअर सेंटर बनवावे. जर ब्लॅक फंगसची लक्षणे असतील तर त्वरित त्यावर उपचार केले पाहिजेत. राज्यात औषधांची कमतरता नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.