भोपाळ Mohan Yadav Interview : उज्जैनच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी सोमवारी (11 डिसेंबर) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजपा आमदारांनी अनुमोदन दिल्यानं मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर मोहन यादव यांनी राजभवन गाठून राज्यपाल मंगू भाई पटेल यांना पत्र सादर करत सरकार स्थापनेचा दावा केला. दरम्यान, राजभवनातून बाहेर आल्यानंतर ईटीव्ही भारतनं मोहन यादव यांच्याशी संवाद साधला.
भाजपा कार्यकर्ता आधारित पक्ष : भोपाळमधील ईटीव्ही भारतच्या ब्युरो चीफ शिफाली पांडे यांनी मोहन यादव यांना प्रश्न विचारला की, ज्याप्रमाणे मध्य प्रदेशचे निकाल आले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी तुमचं नाव येणंही आश्चर्यकारक होतं. यावर मोहन यादव म्हणाले, ही पक्षाची व्यवस्था आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षानं संधी दिली याचा मला आनंद आहे. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून हा पक्ष कार्यकर्त्यांवर आधारित आहे. काँग्रेससह इतर पक्षांनीही भाजपाकडून शिकावं जेणेकरून त्यांचा पक्षही मजबूत होईल.
मी राष्ट्रवादी विचारधारा असलेल्या कुटुंबातून आलोय : पुढं ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी विचारधारा असलेल्या कुटुंबातून आलोय, मला पुढं जाण्यात कोणतीही अडचण आली नाही याचा मला आनंद आहे. तसंच मध्य प्रदेशला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले.
कोण आहेत मोहन यादव : दरम्यान, मोहन यादव यांना तीन गोष्टी मुख्यमंत्रिपदापर्यंत घेऊन गेल्या आहेत. प्रथम म्हणजे संघाशी जवळीक. दुसरी हिंदुत्वाचा चेहरा आणि तिसरी माळव्यातील ओबीसी वर्गाचा मोठा नेता. 58 वर्षीय मोहन यादव हे भाजपाच्या उच्चशिक्षित नेत्यांपैकी एक आहेत. ओबीसी प्रवर्गातील नेते असण्यासोबतच ते संघाची पहिली पसंतीही मानले जातात. मध्यप्रदेशात उच्च शिक्षणमंत्री असताना त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रामचरितमानसचे काही भाग समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये गणना : मोहन यादव यांची गणना राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये होते. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हा खुलासा केला होता. मोहन यादव यांच्याकडे एकूण ४२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये सुमारे 10 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून 32 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2018 मध्ये सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या मंत्र्यांच्या यादीत मोहन यादव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.
हेही वाचा -