नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. हे दोघे जण एका बाकावरून दुसऱ्या बाकावर धावू लागले. त्यानंतर एका व्यक्तीनं त्याच्या बुटातून पिवळा गॅस काढला आणि फवारणी केली. यावेळी संसदेत गदारोळ झाला. खासदारांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. मात्र, काही खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
व्हिजिटर पासवर संसदेत आले : ताब्यात घेतलेल्या आरोपींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या लोकांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा दहशतवादविरोधी युनिट स्पेशल सेल पोहोचला आहे. कारवाईदरम्यान दोघांपैकी एकाचं नाव सागर आहे. दोघंही खासदाराच्या नावानं लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, दोन्ही लोक म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवरून आले होते. या घटनेनंतर सभापती ओम बिर्ला यांनी व्हिजिटर गॅलरीच्या पासवर बंदी घातली आहे.
अधीर रंजन चौधरी काय म्हणाले : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, शून्य तास सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि काहीतरी फेकले, त्यातून गॅस बाहेर पडला. खासदारांनी त्याला पकडलं आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं. सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. हे निश्चितपणे सुरक्षेचे उल्लंघन आहे कारण आज आपण २००१ मध्ये ज्यांनी बलिदान दिले त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत.
अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, अचानक 20 वर्षांच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतली. त्यांच्या हातात डबा होता. या डब्यांमधून पिवळा धूर निघत होता. त्यापैकी एक जण अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न करत होता. ते काही नारे देत होते. हा धूर विषारी असू शकतो. हे सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आहे.