बेळगाव (कर्नाटक) : लातूरचे कॉंग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्या कर्नाटकातील एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या राजहंसगड येथे काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका भव्य पुतळ्याचे अनावरण केले गेले. या कार्यक्रमाला आमदार धीरज देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भाषणाच्या शेवटी जय शिवराय, जय महाराष्ट्र असा नारा दिला. मात्र व्यासपीठावरून परतत असताना ते माईककडे पुन्हा वळाले आणि त्यांनी जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या घोषणेने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सीमाभागात तीव्र संताप : आमदार धीरज देशमुख यांच्या या घोषणेवरून सीमाभागात नागरिकांद्वारे तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. देशमुखांचा जय कर्नाटकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होते आहे. धीरज देशमुख यांचे वडील व माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने सीमाभागातील मराठी माणसांची बाजू लावून धरली होती. त्यांनीच स्वत:हून पुढाकार घेऊन 2004 मध्ये महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला होता. त्यामुळे आता त्यांचे वारसदार या नात्याने धीरज देशमुख यांनी या मुद्याचा पाठपुरावा करणे सीमेवरील नागरिकांना अपेक्षित होते. मात्र देशमुख यांनी बेळगावात येऊन जय कर्नाटकचा दिल्याने येथील मराठी बांधवांच्या भावना दुखवण्याचं काम केल्याची टीका मराठी भाषिकांनी केली आहे.
'बेळगावात येताना विचारा करा' : आमदार धीरज देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पुन्हा एकदा नव्याने चिघळण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी जोरदार टीका केली आहे. धीरज देशमुख यांच्या वक्तव्यामुळे विलासराव देशमुख यांनी सीमावादात दिलेल्या योगदानावर पाणी फेरले गेले असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे. तसेच यापुढे बेळगावात येताना विचारा करा, असा इशाराही शुभम शेळके यांनी धीरज देशमुखांना दिला आहे.
हेही वाचा : Khushbu Sundar : 8 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केले - भाजप नेत्या खुशबू सुंदर