पाटणा Lalu Prasad Yadav : 'लँड फॉर जॉब' प्रकरणी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्याविरोधातील कारवाई तीव्र झाली आहे. ईडीनं बुधवारी लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स बजावलं. जारी केलेल्या समन्समध्ये पिता-पुत्रांना चौकशीसाठी ईडीच्या मुख्यालयात बोलावण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीनं तेजस्वी यादव यांना शुक्रवार, २२ डिसेंबर आणि लालू प्रसाद यादव यांना बुधवारी २७ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलंय.
या प्रकरणी चौकशी : ईडी ज्या प्रकरणाची चौकशी करत आहे, ते प्रकरण फार जुनं आहे. लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्या होत्या. १८ मे २०२२ रोजी सीबीआयनं या प्रकरणी तत्कालीन लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मिसा भारती यांच्यासह १७ जणांना आरोपी बनवून गुन्हा दाखल केला होता. लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वेमंत्री असताना विविध विभागांमध्ये ग्रुप डीच्या नोकऱ्या देण्याच्या बदल्यात जमिनीची मागणी केल्याचा आरोप आहे.
पिता-पुत्रांना बजावलं समन्स : लालू प्रसाद यादव यांनी २००४ ते २००९ या कालावधीत कुटुंबीयांच्या नावे जमीन घेतली होती. ही नोकरी कोणतीही जाहिरात किंवा सार्वजनिक सूचना न देता दिल्याचा आरोपही लालूंवर आहे. ज्यांना नोकरी देण्यात आली, त्यापैकी बहुतांश लोक पाटण्यातील होते. या सर्वांची नियुक्ती मुंबई, जबलपूर, कोलकाता, हाजीपूर विभागात करण्यात आली होती. या प्रकरणात लालू यादव यांच्यानंतर तेजस्वी यादव यांचंही नाव चार्जशीटमध्ये जोडण्यात आलं. आता या प्रकरणी ईडीकडून पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आला आहे.
ऑक्टोबरमध्ये जामीन मंजूर : या प्रकरणाची ऑक्टोबर महिन्यात न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना राऊस कोर्टानं जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यानंतरही यावर सुनावणी झाली. बुधवारी ईडीनं लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना पुन्हा चौकशीसाठी दिल्लीला बोलावलंय.
हे वाचलंत का :