पाटणा : मणिपूर हिंसाचारावरून आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीरमधील शूर जवान शहीद होण्याबद्दल आणि चीनकडून देशात होत असलेल्या घुसखोरीवर चिंता व्यक्त केली आहे. आरजेडी सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांनी ट्विट करत म्हणाले की, मणिपूर जळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आपले शूर जवान शहीद होत आहेत. पण पंतप्रधान आणि गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मीडियाने निर्माण केलेल्या या लोकांनी लोकशाही, निवडणुकीचे राजकारण आणि पदाची प्रतिष्ठा पूर्णपणे नष्ट केली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
लालू यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले : जम्मू-काश्मीरमध्ये आमचे शूर सैनिक शहीद झाले, मणिपूर जळत आहे, चीन आमच्या देशात घुसतोय. विद्यार्थी, तरुण, कर्मचारी, व्यापारी, खेळाडू त्रस्त आहेत, गुजरातमधून 5 वर्षांत 40,000 महिला गायब झाल्या, पण पंतप्रधान आणि गृहमंत्री निवडणूक प्रचारात मग्न आहेत आणि देश गोंधळात आहे. माध्यमांनी निर्माण केलेल्या या लोकांनी लोकशाही, निवडणुकीचे राजकारण आणि पदाची प्रतिष्ठा नष्ट केली आहे.
लालू यादव यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आदिवासींनी 3 मे रोजी एकता मोर्चा काढला. तेव्हापासून राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. परिस्थिती अशी बनली की, दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. वातावरण अजूनही तणावपूर्ण असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, जम्मूमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे अनेक जवान शहीद झाले आहेत. यासाठी लालू यादव यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. यापूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनीही मणिपूर हिंसाचाराबाबत केंद्र सरकारच्या दुर्लक्षावर निशाणा साधला होता.