श्रीनगर : लडाखच्या लेह जिल्ह्यातील चांगथांग भागामध्ये काही चीनी वाहने शिरल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट होत नसले, तरी रविवारी हा व्हिडिओ सगळीकडे पसरला, आणि ही बाब उघड झाली. यामध्ये चीनी नागरिक भारताच्या काही भागात शिरुन स्थानिकांशी हुज्जत घालतानाही दिसून येत आहेत.
काही दिवसांपूर्वीची घटना..
हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर स्थानिकांमध्ये असंतोष पसरला असून, त्याविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. भारतीय सैन्याने याबाबत अजून कोणतेही वक्तव्य केले नसले, तरी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. लडाखच्या न्योमा मतदारसंघातील नगरसेवक इश्ये स्पालझंग यांनी ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले, मात्र याबाबत आपल्याला अधिक काही माहिती नाही, असेही ते म्हणाले.
"काही चीनी गाड्या लडाखमध्ये आल्या होत्या. यावेळी त्या भागात गुरे राखण्यासाठी गेलेल्या लोकांशी चीनी लोकांनी हुज्जत घातली. या भागामध्ये आपली गुरे चरण्यासाठी आणू नका असे त्यांचे म्हणणे होते", अशी माहिती इश्ये यांनी दिली.
प्रशासनाने यावर काय कारवाई केली असे विचारले असता, इश्ये यांनी सांगितले की ते लोक आले, त्यांनी हुज्जत घातली आणि निघून गेले. केवळ त्या भागात गुरे चरण्यासाठी नेऊ नये एवढेच त्यांचे म्हणणे होते. मात्र, हा भाग भारताच्या हद्दीत येतो, त्यामुळे स्थानिकांनी तिथे न जाण्याचा प्रश्नच येत नाही. यावर प्रशासनाने अद्याप काही कारवाई केली नाही.
हेही वाचा : 'पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमावेळी वाजवाव्या थाळ्या'; शेतकऱ्यांचे देशवासियांना आवाहन