नवी दिल्ली : आतापर्यंत कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पार पडले आहेत. त्यामुळे कोरोना परिस्थिती लक्षात घेता इथून पुढचा कुंभमेळा केवळ प्रतिकात्मक ठेवावा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला ताकद मिळेल असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी ट्विट करत सांगितले, की त्यांनी याबाबत जुना अखाडाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी कोरोनाची लागण झालेल्या साधूंबाबत विचारपूस केली. तसेच, सर्व अखाड्यांमार्फत प्रशासनाला केल्या जाणाऱ्या सहकार्याबाबत त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. यानंतर कोरोना परिस्थिती पाहता बाकी कुंभमेळ्यातील सहभाग हा प्रतिकात्मक असावा. यासाठी सर्वच साधू आणि भाविकांऐवजी काही प्रतिनिधींनी याला हजेरी लावावी असे आवाहनही आपण केल्याचे त्यांनी सांगितले.
भाविकांना कुंभला न येण्याचे आवाहन..
यानंतर स्वामी अवधेशानंद यांनी लोकांना कुंभमेळ्यात स्नानासाठी न येण्याची विनंती केली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले. इतरांच्या प्राणांची सुरक्षा बाळगणेही पुण्याचे काम असल्याचे ते म्हणाले.
कुंभमध्ये हजारोंना कोरोनाची लागण..
सध्याच्या कुंभमेळ्यात कित्येक साधू आणि भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, निर्वाणी अखाड्याच्या महामंडलेश्वरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर काही आखाड्यांनी आपल्यापुरता कुंभमेळा आटोपता घेतला आहे. एरवी १२ वर्षांमधून एकदा होणारा हा कुंभमेळा जानेवारी ते एप्रिलपर्यंत घेण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे याचा कालावधी १ ते ३० एप्रिलपर्यंतच ठेवण्यात आला आहे.