देहराडून : हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामधील ३० साधूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. झा यांनी याबाबत आज (शुक्रवार) माहिती दिली.
या कुंभमेळ्यामधील प्रत्येक अखाड्यामध्ये जात वैद्यकीय पथके सातत्याने आरटी-पीसीआर चाचण्या करत आहेत. १७ एप्रिलनंतर ही प्रक्रिया आणखी वेगाने करण्यात येणार आहे. सध्या पॉझिटिव्ह आलेल्या साधूंपैकी जे हरिद्वारमधील आहेत, त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच, जे साधू बाहेरुन आले होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालायाने दिली.
डॉ. झा यांनी सांगितले, की ज्या साधूंची प्रकृती गंभीर आहे त्यांना ऋषिकेशमधील एम्समध्ये दाखल करण्यात येत आहे.
महानिर्वाणी अखाड्याचे महंत कोरोनामुळे कालवश..
दरम्यान, महा निर्वाणी अखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून ते हरिद्वारमध्ये आले होते. कुंभमेळ्यात कोरोनाने निधन होणारे कपिल देव हे पहिले मोठे संत आहेत. तसेच, गेल्या पाच दिवसांमध्ये कुंभमेळ्यातील एकूण २,१६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : ऑक्सिजनबाबत केंद्राचा मोठा निर्णय; देशातील १०० रुग्णालयांना मिळणार स्वतःचा प्लांट