बेंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारस्वामी यांच्यावर कॉंग्रेस पक्षानं दिवाळीदरम्यान वीज चोरी केल्याचा आरोप लगावला होता. बेंगळुरू विद्युत पुरवठा कंपनी (BESCOM) च्या दक्षता कक्षानं भारतीय विद्युत कायदा (वीज चोरी) च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुमारस्वामी यांचं स्पष्टीकरण : राज्यातील सत्ताधारी पक्षानं कुमारस्वामी यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली होती. यावर स्पष्टीकरण देताना कुमारस्वामी म्हणाले की, ही त्यांची चूक नसून एका खाजगी डेकोरेटरची चूक आहे. "त्यानं जवळच्या विद्युत खांबावरून थेट कनेक्शन घेतलं. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी तात्काळ ते काढून टाकलं आणि घराच्या मीटर बोर्डवरून वीज जोडणी करून घेतली", असं ते म्हणाले.
काँग्रेसनं काय आरोप केला होता : काँग्रेसनं कुमारस्वामी यांच्यावर आरोप केला होता की, दिवाळीच्या दिवशी त्यांच्या जे. पी. नगर येथील निवासस्थानी बेकायदेशीर वीज जोडणीसह झगमगाट करण्यात आला होता. एका माजी मुख्यमंत्र्यांना चक्क वीजचोरी करावी लागते ही शोकांतिका आहे, असं पक्षानं म्हटलं होतं. कुमारस्वामी यांच्यावर ताशेरे ओढत पक्षानं म्हटलं की, काँग्रेस सरकारची 'गृह ज्योती' योजना निवासी कनेक्शनसाठी दरमहा २०० युनिट मोफत वीज पुरवते, २ हजार युनिट नाही.
'छोटा मुद्दा' मोठा बनवला : काँग्रेसच्या या आरोपांना कुमारस्वामी यांनी 'X' वर पोस्ट करत उत्तर दिलं. हा 'छोटा मुद्दा' मोठा बनवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. "मला या अविवेकीपणाबद्दल खेद वाटतो. बंगलोर विद्युत पुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येऊन तपासणी करावी आणि नोटीस जारी करावी. मी दंड भरेन", असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. या प्रकरणी बंगलोर विद्युत पुरवठा कंपनी कारवाई करेल, असं उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले.
हेही वाचा :