कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या स्ट्रँड रोडवरील बहुमजली इमारतीच्या आगीत मंगळवारी सकाळीपर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे मृतदेह इतक्या प्रमाणात जळाले आहेत, की त्यांची ओळख पटवणे अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी डॉक्टरांनी डीएनए चाचण्या करण्याचा पर्याय निवडला आहे.
पहाटे आढळले आणखी दोन मृतदेह..
कोलकात्याच्या नव्या कोलीघाट इमारतीमध्ये सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी सात जणांचे मृतदेह काल रात्री उशीरा बाहेर काढण्यात आले. तर, आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास लिफ्टजवळ आणखी दोन मृतदेह आढळून आले. यांमध्ये अग्नीशामक दलाचे चार कर्मचारी, आरपीएफचे दोन जवान आणि एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू..
गिरीश डे, गौरव बेज, अनिरुद्ध जना आणि बिमान पुर्कायत अशी प्राण गमावलेल्या चार अग्नीशामक दलातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. आरपीएफ कॉन्स्टेबल संजय साहनी यांनीही या दुर्घटनेत आपले प्राण गमावले. नव्याने आढळलेल्या दोघांची ओळख अद्याप पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री आढळलेल्या सात मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून, नव्याने आढळलेल्या दोन मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश..
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 'सुओ मोटो' दाखल केली असून, अग्नीशामक दलानेही या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. पूर्व रेल्वेनेही याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : मुंबई-नाशिक महामार्गावरील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग