नवी दिल्ली - देश कोरोनाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा आज गाठणार आहे. या लसीकरणाची राज्यातही सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे पुढे ढकलेला गोवा फेस्टिव्हल आजपासून सुरू होत आहे. अशा महत्त्वाच्या घटनांचा वेध घेतला आहे.
1. कोरोना लसीकरण मोहीमेची आज देशभरात सुरुवात
नवी दिल्ली- देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी 10.30 वाजता विलेपार्लेतल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदी आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात करत आहेत. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. कोरोना लसीकरणासाठी देशभरात २ हजार ९३४ बुथ सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यातील काही लाभार्थ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. आज देशातील सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.

२. पंतप्रधानांचा स्टार्टअप्शी संवाद
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आहेत आणि 'प्रारंभ' या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्सच्या शिखर परीषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. ही परीषद वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने येत्या 15-16 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली आहे. ऑगस्ट 2019 ला काठमांडू येथे झालेल्या चौथ्या बिमस्टेक परीषदेत पंतप्रधानांनी बिमस्टेक स्टार्ट अप्स कॉनक्लेव्हचे यजमानपद भूषविण्याचे जाहीर केले होते. या घोषणेचा पाठपुरावा करण्यासाठी ही दोन दिवसीय परीषद आयोजित करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्ट अप उपक्रमाचा आरंभ केला होता त्याचा हा पाचवा वर्धापनदिन आहे.

३. राज्यात काँग्रेस राजभवनला घालणार घेराव
मुंबई - केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील 50 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आज ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

४. गोवा फिल्म फेस्टीवल आजपासून सुरू
नवी दिल्ली – गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साजरा होत असतो. मात्र यंदा कोविड-19 च्या जागतिक महामारीने हा 51 वा फिल्म फेस्टीवल 16 ते 24 जानेवारी अशा नऊ दिवसांत पणजी येथे साजरा केला जाणार आहे. केंद्रिय माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निवडक प्रेक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ आणि समारोपाचे कार्यक्रम होणार आहे. तर बहुतांश चित्रपट हे ऑनलाईन प्रदर्शित होणार आहेत.

५. ओपोचा नवा स्मार्टफोन होणार लाँच
नवी दिल्ली- ओपो भारतात अपनी ‘एफ सीरीज’ चा विस्तार करणार आहे. यामध्ये ओप्पो एफ 15 हा लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आज उपलब्ध होणार आहे.

६. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे लोकार्पण
औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी ठाकरे सरकारने औरंगाबाद पालिकेला 148 कोटींचा निधी दिला आहे. त्या निधीतून शहरातील कांचनवाडी, पडेगाव, चिकलठाणा या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कचरा प्रकल्पांचे लोकार्पण राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

७. पोलिसांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर सुनावणी
रायगड - रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दाखल केलेली पुनर्निरीक्षण याचिकेवरील सुनावणी आज होणार आहे. याबाबत न्यायालय काय निकाल देणार, हे कळणार आहे. या प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हेदेखील आरोपी आहेत.

८. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत होणार लसीकरणाचा प्रारंभ
मुंबई - कोरोनाच्या लढ्यात निर्णायक टप्पा आज महाराष्ट्र गाठत आहे. राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत.

९. वर्सोवा मेट्रो स्टेशनवर आजपासून भाड्याने मिळू शकणार सायकल
मुंबई- वर्सोवा-अंधेरी घाटकोपर या मार्गावर वर्सोवा स्टेशनजवळ सायकल भाडेतत्त्वावर देण्याची नवी सुविधा आजपासून सुरू होत आहे. प्रति तास 2 रुपये या दराने मुंबईकरांना ही सेवा वापरता येणार आहे. लवकरच घाटकोपर-वर्सोवा मार्गावर 8 अजून नव्या स्थानकांवर सायकलची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.यापूर्वी जागृती नगर मेट्रो स्टेशनवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.

१० सोलापुरच्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज शेवटचा दिवस
सोलापूर- ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी यात्रा भव्य करणे टाळण्यात आले आहे. केवळ ५० मानकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. यात्रेनिमित्त १२ जानेवारी सुरू केलेली शहरात येण्याच्या मार्गावर लागू केलेली नाकाबंदीही आज संपणार आहे. महिनाभर मोठ्या उत्साहात चालणारी सिद्धेश्वर महायात्रा प्रशासनाने चार दिवसांवर आणली आहे.
