केरळ - स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना, आपल्या मातृभूमीला ब्रिटिशांच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला, त्यांना विसरता येणे शक्य नाही. केरळच्या मलबार भागातील क्रांतीचे नेतृत्व करणारे शूर योद्धा केरळ वर्मा पळाशिराजा यांचे नाव आजही स्वातंत्र्याच्या इतिहासात नमूद केले जाते. पळाशिराजा यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या वायनाडमधील दंगल ही ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षातील एक गौरवशाली अध्याय आहे.
पळाशीराजांची वायनाडमधील दोन स्मारके
आजही वीर पळाशी राजांची वायनाडमधील दोन स्मारके त्यांच्या संघर्षांची आठवण करुन देतात. पुलपल्ली माविलमथुडच्या काठावर पळाशी यांचे स्मारक स्तूप आहे. जिथे पळाशीराजा शहीद झाले होते आणि मंथवाडी येथील त्यांचे थडगे त्यांच्या उल्लेखनीय लढाईची गौरवगाथा सांगते. नायर सैनिक आणि कुरिच्या सैनिकांच्या मदतीने पळाशीराजांनी पुकारलेला गनिमी कावा कौतुकास्पद होता. कन्नवम आणि वायनाडचे जंगल ब्रिटिशांविरोधात झालेल्या या लढ्याचे साक्षीदार राहिले आहे.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : बहादुरशाह जफर यांचा ब्रिटिशांविरोधातील लढा, वाचा सविस्तर...
वीर पळाशीराजांच्या संघर्षाचा इतिहास
बलाढ्य ब्रिटिश सैन्याच्या तोफा आणि दारूगोळ्याला तोंड देत आपल्या सैन्याचे मनोबल अबाधित राखणारे वीर पळाशी होते. 1805 मध्ये केरळ-कर्नाटक सीमेजवळील माविलमथुड नदीच्या काठावर पळाशीराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल दोन कथा आहेत. लोकांच्या एका गटाचा असा दावा आहे, की त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या हाती लागण्यापूर्वीच हिऱ्याची अंगठी गिळून आत्महत्या केली. तर दुसऱ्या गटाच्या मते, त्यांना ब्रिटिशांनी गोळ्या झाडून ठार केले. ब्रिटिशांनी वीर पळाशींचा मृतदेह अत्यंत आदराने माविलमथुड नदीच्या तीरावरून मंथवाडी टेकडीच्या शिखरावर आणला, असेही सांगितले जाते. असे असले तरी, पाळाशींचे सेनापती तलक्कल चंथू आणि एडाचेना कुंकण यांची अजूनही फारशी स्मारके आढळत नाहीत. विविध संग्रहालयांमध्ये विखुरलेल्या वीर पळाशी यांच्या संघर्षाचा इतिहास एकत्रित करून त्यांच्या क्रांतीचे संग्रहित साहित्य प्रकाशित करावे, अशी मागणीही इतिहासकार करत आहेत.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : संगीतालाच शस्त्र बनविणारे स्वातंत्र्य सेनानी रामसिंह ठाकूर, वाचा सविस्तर...