कोची - केरळमधील संतोष जॉर्ज कुलंगारा हे फक्त एका राज्याचे नाही, तर संपूर्ण देशाची ओळख होणार आहेत. संतोष जार्ज हे अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यांनी अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या अंतराळ पर्यटन कार्यक्रमात आपले तिकीट बूक केले आहे. अंतराळ मिशनसाठी तिकीट बुक करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत.
संतोष जॉर्ज कुलंगारा प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 24 वर्षात त्यांनी 130 हून अधिक देशांचा प्रवास केला आहे. ते 'संचारम' (Sancharam) नावाचा एक कार्यक्रम चालवतात. 'संचारम' ने आतापर्यंत 1800 एपिसोड प्रसारित केले आहेत. संतोषने 2007 मध्ये अंतराळ प्रवासाचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा त्यांनी संधी मिळाली नव्हती. आता ते अवकाशाची सफर करणार आहेत. यात्रेची किंमत अंदाजे 2.5 लाख डॉलर (1.8 कोटी रुपये) आहे. संतोष आपला संपूर्ण प्रवास कॅमेर्यामध्ये कैद करणार आहेत.
व्हर्जिन गॅलॅक्टिक ही एक खासगी स्पेसफ्लाइट कंपनी आहे. जगातील सर्वोत्तम पर्यटकांना अंतराळात नेणे हे त्यांचे लक्ष्य आहे. रिचर्ड ब्रॅन्सन व्हर्जिन गॅलॅक्टिकचे संस्थापक आहेत. उद्योगजगतात अनेक दशकांपासून यशाची शिखरे पादक्रांत करणारे ब्रिटनचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अंतराळात प्रवास केला होता. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्णत्वास नेतात, असा त्यांचा लौकिक आहे. त्यांनी खासगी अंतराळ पर्यटनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं गेलं.
काही दिवसांपूर्वीच भारतीय वंशाची सिरीशा बंडला व्हर्जिन गॅलॅक्टिक युनिटी -22 वरून यशस्वी अंतराळ भरारी घेतली. सिरीशा बंडला ही चौथी भारतीय वंशाची आणि अंतराळात उड्डाण करणारी तिसरी भारतीय वंशाची महिला ठरली आहे. यापूर्वी स्क्वॉड्रॉन लीडर राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी अंतराळापर्यंत प्रवास केला आहे.