तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये डाव्या आघाडीसोबत असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका बसला आहे. पाला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी रविवारी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीने कप्पन यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या महिनाभरापासून मनी कपन्न यांनी यूडीएफमध्ये प्रेवशाचे प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात त्यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, केरळ प्रदेशाध्यक्ष टी पी पितांबरन यांचा यूडीएफशी हातमिळवणी करण्यास विरोध होता. अखेेर रविवारी आमदार कप्पन यांनी काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये यूडीएफमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या नेतृत्तावत ‘एश्वर्य केरळा’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ती संवाद यात्रा ज्यावेळी पाला मतदारसंघात पोहोचली त्यावेळी कप्पन यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसप्रणित यूडीएफमध्ये प्रवेश केला.
कप्पन यांचे स्वागत करताना चेन्निथला म्हणाले की, डावी आघाडी तर बुडते जहाज आहे, कप्पन त्या जहाजातून वाचले आहेत. यावेळी आमदार कप्पन यांनी केरळ काँग्रसचे(एम) चे नेते जोस के मणी यांच्यावर टीकास्त्र सोडताना आरोप केला की, जोस यांनी मी पालामध्ये सुरू केलेल्या विकास कामांना खीळ घालण्याचे काम केले आहे. तसेच एलडीएफने राष्ट्रवादीला चार जागा देण्याचे कबूल केले होते, त्यामुळे आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आम्हाला पाला मतदारसंघाऐवजी कुट्टनाड मतदारसंघ देण्यात येईल, असे म्हटले. त्यामुळे कप्पन यांनी एलडीएफला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
कप्पन नव्या पक्षाची करणार घोषणा?
सुत्रांच्या माहिती नुसार आमदार कप्पन हे लवकरच आपल्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करणार आहेत. त्यांचा तो पक्ष यूडीएफचा भाग असेल. यापूर्वी कप्पन यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पाला मतदारसंघाची पोट निवडणूक लढवून विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस नेते तथा यूडीएफचे उमेदवार जोश टॉम यांचा पराभव केला होता. पाला विधानसभेची पोट निवडणूक केरळ काँग्रेसचे प्रमुख के एम मणी यांचे निधन झाल्याने लागली होती. मणी यांनी तब्बल ५० वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने पोट निवडणुकीत ही जागा खेचून आणली होती.
पालाची जागा केरळ काँग्रेसला-
या पंचवार्षिक निवडणुकीत सध्या सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीकडून (एलडीएफ) या पाला विधानसभा मतदारसंघाची जागा केरळ काँग्रेस (एम)ला सोडण्यात येणार असल्यची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर कप्पन यांनी एलडीएफमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केरळ काँग्रेस (एम)चे प्रमुख जोस के मणी यांनी नुकतेच युडीएफला सोड चिठ्ठी देऊन डाव्या आघाडीशी हात मिळवणी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
राष्ट्रवादी करणार कारवाई -
पालाचे राष्ट्रवादीचे आमदार कप्पन यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा तर पाला मतदरांसघातील मतदारांचा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे केरळचे परिवहन मंत्री ए के शशींद्रन यांनी दिली आहे. तसेच कप्पन यांच्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचेही संकते त्यांनी दिले आहेत.
मणी कप्पन यांच्या नवीन पक्षाच्या घोषणेवर बोलताना शशींद्रन म्हणाले की त्यांनी तो मुद्दा राजकीय नाही तर भावनिक केला असल्याचीही प्रतिक्रिया दिली. पाला मतदारसंघाच्या जागा वाटपावरून डाव्या आघाडीसोबत वाद निर्माण झाल्यानंतर कप्पन यांनी यूडीएफसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कप्पन यांना पाला मतदारसंघातूनच ही निवडणूक लढवायची आहे. मात्र कप्पन यांच्या या निर्णयामुळे डाव्या आघाडीत राष्ट्रवादीसोबत वाद निर्माण झाले. तसेच कप्पन यांच्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा खराब झाली असून आता पाला मतदारसंघावर बोलण्यात काहीच अर्थ नसल्याचेही शशींद्रन म्हणाले.
मणी कप्पन यांचा नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय अयोग्य आहे. यावर पक्षाचे नेतृत्वाला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल. कप्पन यांच्यासोबत तीन पेक्षा जास्त नेते नाहीत, अनेक नेते त्यांच्यासोबत आहेत, तो त्यांचा दावाही चुकीचा असल्याचेही मंत्री शशींद्रन म्हणाले. तर प्रदेशाध्यक्ष पिंताबरन यांच्या मते कप्पन यांच्या जाण्यामुळे पक्षाला मोठे नुकसान होणार आहे. तसेच कप्पन यांच्या सोबत १० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.