देहराडून : चारधाम यात्रा करणे ही प्रत्येक भाविकांची मनापासून इच्छा असते. त्यासाठी भाविक चारधाम असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत असतात. या भक्तांसाठी खूशखबर असून चारधाम यात्रा 2023 साठी केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 06.20 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे वैदिक मंत्रोच्चाराने भाविकांसाठी उघडण्यात आले. लष्करी बँडच्या सुरांसोबत हर हर महादेवचा जयघोष केदारधाममध्ये घुमत आहे. यावेळी केदारधाममध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.
कडाक्याच्या थंडीत उघडण्यात आले दरवाजे : कडाक्याच्या थंडीत आज सकाळपासूनच केदारधामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. भाविकांच्या मोठ्या गर्दीत धार्मिक परंपरा पार पडल्या. उत्सव डोलीत बसून बाबा केदारनाथ यांची पंचमुखी भोग मूर्ती रावल निवास येथून मंदिर परिसरात आणण्यात आली. त्यानंतर हर हर महादेवाचा जयघोष झाला. रावल यांनी येथे भाविकांना आशीर्वाद दिले. यानंतर रावल, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केदारनाथ मंदिर समितीचे अधिकारी, पदाधिकारी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत बाबा केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले.
केदारनाथला सुरू आहे बर्फवृष्टी : केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या संख्येने भाविक केदारनाथमध्ये उपस्थित होते. केदारनाथ पोर्टल सुरू केल्यानंतर मंदिरात उपस्थित भाविक खूप उत्साही होते. सर्वांनी बाबा केदारनाथांचे आशीर्वाद घेतले. दरवाजे उघडण्यापूर्वी केदारनाथ धाम 23 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. या वर्षी केदारनाथ यात्रेबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वातावरणातील बदलामुळे भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ धामला पोहोचत आहेत. केदारनाथ धाममध्ये अजूनही बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे येथील अडचणी वाढत आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसात केदारनाथमध्ये पावसासह बर्फवृष्टीचा इशाराही दिला आहे. यानंतरही मोठ्या संख्येने भाविक केदारनाथमध्ये पोहोचले आहेत.
प्रशासनाने केली तगडी व्यवस्था : केदारनाथमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भाविकांचे हाल होऊ नये, म्हणून प्रशासनाने तगडी व्यवस्था पुरवली आहे. केदारनाथमध्ये यात्रेकरूंसाठी वैद्यकीय मदत चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. यात्रा मार्गांवर 130 डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी, ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रेची नोंदणी बंद आहे. केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी मार्गांवर थांबवण्यात येत आहे.
हेही वाचा - YS Sharmila Send To Jail : पोलिसांना मारहाण करणे भोवले! वाय एस शर्मीला यांना 14 दिवसांची कोठडी