हुबळी - कर्नाटक पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने शुक्रवारी धारवाड जिल्ह्यातील दगड क्रशर युनिटमधून 234 जिलेटिन कांड्या ताब्यात घेतल्या आहेत. काळघाटगी तालुक्यातील शिवचंद्रन स्टोन क्रशर युनिटवर पोलीस पथकाकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल 234 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्फोटकाने भरलेल्या ट्रकचा स्फोट
21 जानेवारीच्या रात्री कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे स्फोटकाने भरलेल्या ट्रकचा स्फोट झाला होता. यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास हा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे परिसरातील गावे देखील हदरली होती. या स्फोटात मृत्यूमुखी पडलेले कामगार खोदकाम करण्यासाठी या स्फोटकांची वाहतूक करत होते. त्याच दरम्यान हा स्फोट झाला. यानंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली असून, शिवचंद्रन स्टोन क्रशरवर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये 234 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत.