गदग (कर्नाटक) : कांद्याने कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. गदग जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा कांदा उत्पादक क्षेत्र आहे. स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आपला कांदा बंगळुरूच्या बाजारपेठेत घेऊन जातात. यंदा देखील नफा मिळेल या विचाराने गदग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बंगळुरु बाजारपेठेत कांदा नेला, मात्र तेथे देखील कांद्याला चांगला भाव मिळाला नाही.
![Onion](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/erullikanniru_29112022222805_2911f_1669741085_454_3011newsroom_1669775610_68.jpg)
इतर राज्यांच्या तुलतेत कमी भाव : यंदा गदग तालुक्यातील तिम्मापुरा गावातील शेतकऱ्यांना क्विंटलला 50, 100, 200 रुपयेच दर मिळाला. पावडेप्पा हलिकेरी या शेतकऱ्याने सुमारे 205 किलो कांदा विकला. खर्च वजा केल्यावर त्याच्याकडे केवळ 8.36 रुपये शिल्लक राहिले. आपल्या पिकवलेल्या कांद्याला इतर राज्यातील कांद्याच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कर्नाटकातला शेतकरी हवालदिल झाला आहे. बंगळुरू आणि यशवंतपूर मार्केटमध्ये 212 किलो कांदा विकलेल्या आणखी एका शेतकऱ्याला फक्त 424 रुपये मिळाले. पोर्टर फी, ट्रान्सपोर्ट चार्ज, पोर्टर, ब्रोकर यासह अन्य खर्चाचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या केवळ 4 ते 10 रुपयेच मिळतात.
किमान आधारभूत किंमत द्यावी : कर्नाटकचे कृषी मंत्री हे गदग जिल्ह्याचे प्रभारी मंत्री देखील आहेत. कांदा उत्पादकांनी त्यांना योग्य आधारभूत किंमत मिळावी अशी मागणी केली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना सरकार किमान आधारभूत किंमत जाहीर करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी आशा कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.