बंगळुरू (कर्नाटक) - गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांच्या राजीनामाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर ते आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला. राज्यपालांनी येदियुरप्पांचा राजीनामा स्विकारला असून त्याबाबतचे पत्रही जारी केले.
निरोपाच्या भाषणात येदियुरप्पा काय म्हणाले?
एका कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या निरोपाच्या भाषणादरम्यान त्यांनी आपण आपल्या कामावर समाधानी असल्याची भावना व्यक्त केली. आम्ही पक्षाच्या विकासासाठी मेहनत केली. मी पक्षाच्या विकासासाठी संघर्ष केला आणि मी माझ्या कामावर समाधानी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारकापासून मी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहे.
माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी स्वत:ला वचन दिले होते की, मी यानंतरचे सर्व आयुष्य लोकांच्या सेवेसाठी घालवेन आणि मी ते करुन दाखवले. जनसंघापासून मी शेतकरी आणि दलितांसाठी कार्य केले.
जेव्हा राजनाथ सिंह यांनी माझ्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी फार कौतुक केले होते. जेव्हा माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी केंद्रात मंत्रिपदासाठी बोलावले होते. मात्र, मी त्यांना नकार दिला होता, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या दोन जागा होत्या तेव्हापासून मी राज्यात भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले. जनतेने आम्हाला सहकार्य केले. लाखो कार्यकर्त्यांच्या शक्तीमुळेच भाजप आज सत्तेत आहे. भाजपात नियमावलीनुसार 75 वर्षांच्या वर पदावर राहता येत नाही. मात्र, मी त्याला अपवाद राहिलो.
फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच सत्तेत आल्यावर देशाला ताकदवाद बनवू शकतात. मी त्यांच्या विजयासाठी तसेच जगात देशाचे वेगळे स्थान निर्माण होण्यासाठी प्रार्थना करतो.
हेही वाचा - कर्नाटक रणसंग्राम : पक्षश्रेष्ठींनी येदियुरप्पांचा राजीनामा का मागितला?