बंगळुरू : कर्नाटकच्या बेळगावी येथे आज कर्नाटक रक्षण वेदिके (करवे) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. अगोदर शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर व रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिल्यानंतर आता करवे कार्यकर्त्यांनी पुन्हा मराठी फलकांना काळे फासल्याची घटना समोर आली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर असणाऱ्या मराठी हॉटेलच्या पाट्यांना या कार्यकर्त्यांनी काळे फासले. तसेच हॉटेल चालकांना मराठी फलक न वापरण्याची ताकीदही या कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी कित्येक मराठी फलक फेकूनही देण्यात आले. यासोबतच त्यांनी रस्त्यावर असणाऱ्या मराठी पाट्यांवरही या कार्यकर्त्यांनी शाई फासली.
शिवसेना नेत्याच्या गाडीवरील मराठी नंबरप्लेट काढली..
यावेळी करवे कार्यकर्त्यांनी एका शिवसेना नेत्याच्या चारचाकीवरील मराठी नंबरप्लेटही हटवली. यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. बेळगावीमधील रामलिंग खांदागल्लीमध्ये असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर हा सर्व प्रकार झाला. यानंतर परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा : कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर; कर्नाटकची बस वाहतूक रोखली