ग्वालियर (म.प्र) - केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बेजबाबदार कृत्य केल्याचे समोर आले आहे. सिंधिया यांनी स्वत:चा मास्क काढून तो माजी मंत्री अनूप मिश्रा यांना घातला. सिंधिया हे काटेकोरपणे कोविड नियम पाळतात आणि पाळून घेतात, असे मानले जाते. मात्र, त्यांच्या या कृत्यावर आता आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - उरी: रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; पाच एके-47, 70 हँड ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया गुरुवारी सकाळी आपल्या कुलदेवी मांढरे मातेच्या दर्शनासाठी आले होते. येथे त्यांची भेट माजी मंत्री अनूप मिश्रा यांच्याशी झाली. यावेळी अनूप मिश्रा यांनी मास्क घातला नव्हता, म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत:चा मास्क अनूप मिश्रा यांना घातला. कोविड मार्गदर्शक तत्वांनुसार कोणाचा वापरलेला मास्क परत वापरला जाऊ शकत नाही.
सिंधिया यांनी घातला होता डबल मास्क
सिंधिया यांच्याकडून मिश्रा यांना मास्क घातल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सिंधिया यांनी दोन मास्क घातले होते आणि त्यांनी वर घातलेला मास्क काढून तो अनूप मिश्रा यांना घातला होता, तरी देखील असे करणे हे कोरोना नियमांच्या विरुद्ध आहे. कारण, असे केल्याने देखील विषाणूच्या संसर्गाचा धोका असतो.
अनूप मिश्रा हे एकेकाळी सिंधियांचे कट्टर विरोधक होते
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे भाचे आणि माजी मंत्री अनूप मिश्रा हे एकेकाळी सिंधिया कुटुंबाचे कट्टर विरोधक असल्याचे मानले जायचे. माधवराव सिंधिया यांच्यावेळी आणि त्यांच्या नंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावेळी मिश्रा हे त्यांच्या विरोधात खूप आक्रमक पद्धतीने प्रचार करत होते. मात्र, गुरुवारी चित्र बदलल्याचे दिसून आले. मिश्रा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या येण्या आधीच मांढरे मातेच्या मंदिरात पोहोचले आणि तेथे सिंधिया यांचे स्वागत केले.
जोपर्यंत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मांढरे माता मंदिरात पुजा केली, तोपर्यंत अनूप मिश्रा तेथे उपस्थित होते. सिंधिया आणि मिश्रा यांच्यात येथे बराच काळ चर्चा देखील झाली. दोघांच्या या कृत्यातून, अनूप मिश्रा परत राज्याच्या राजकारणात आपले पाय रोवण्यासाठी सिंधिया यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, असे मानले जात आहे.
हेही वाचा - हरियाणात शाळेचे छत कोसळले; 25 विद्यार्थी गंभीर जखमी