श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या 34 मतदारसंघात मतदान पार पडले, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येकी 17 मतदारसंघांचा समावेश आहे. यासोबतच, 50 'सरपंच'पदांसाठीच्या पोटनिवडणुकांसाठी आणि 216 'पंच' पदांसाठीही आज मतदान पार पडले आहे.
आज मतदान पार पडलेल्या काश्मीरमधील 17 मतदारसंघांतून एकूण 138 उमेदवार उभे होते. यामध्ये 48 महिलांचा समावेश आहे. तर, जम्मूच्या 17 मतदारसंघांमध्ये 111 उमेदवार उभे होते, ज्यांपैकी 34 महिला होत्या. आज जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 7 लाख 17 हजार 322 मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य ठरवले.
इंटरनेट सेवा ठप्प..
मतदानाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील ठराविक ठिकाणी इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली होती.
सहा पक्ष एकत्र लढवतायत निवडणूक..
जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे विशेष लक्ष लागून आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स पुल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढत आहे. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.
आठ टप्प्यांमध्ये पार पडणार मतदान..
या निवडणुकांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 28 नोव्हेंबरला याच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले, ज्यामध्ये 51.76 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर 1 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 48.62 टक्के मतदानाची नोंद झाली. 4 डिसेंबरला पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात 50. 53 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यापुढे 10, 13, 16 आणि 19 डिसेंबरला पुढील टप्प्यांमधील मतदान पार पडणार आहे.
हेही वाचा : 'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा..