नवी दिल्ली : देशात सध्या सगळीकडेच कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कित्येक लसीकरण केंद्रे बंद झाली असून, बऱ्याच ठिकाणी पहिला डोस देणे बंद करण्यात आले आहे. यातच, देशातील नागरिकांना गरज असताना, कोरोना लसीची निर्यात करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. कोरोना लसींची कमतरता हा गंभीर प्रश्न असून, ही उत्सव साजरा करण्याची वेळ नाही असेही ते म्हणाले.
राज्यांना निःपक्षपातीपणे मदत करा..
यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारला राज्यांना निःपक्षपातीपणे लस वाटप करण्याचे आवाहन केले. तसेच, ज्या राज्यांमध्ये आवश्यकता आहे त्यांना तातडीने आणखी लसी उपलब्ध करुन द्या असेही ते म्हणाले. आपण सर्वांनी एकत्र येत ये महामारीला हरवायचे आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.
मोदींनी केलंय लसीकरण उत्सवाचं आवाहन..
दरम्यान, देशभरातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी सध्यस्थितीची माहिती आणि लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार वाढत असून येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान लसीकरण उत्सव साजरा करा असे मोदी म्हणाले होते.
हेही वाचा : महाराष्ट्रातील 'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार'; प्रकाश जावडेकर यांची टीका