नवी दिल्ली - एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील इस्राईलच्या दूतावासाबाहेर काल (शुक्रवार) कमी शक्तीचा बॉम्ब स्फोट झाला. एका फुलदानीत हा बॉम्ब ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. भारत आणि इस्राईल राजनैतिक संबंधांना २९ वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी हा स्फोट झाला. जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेबाबतची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मिळवण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनास्थळावरून एक धमकीचे पत्रही मिळाले आहे. या पत्रातील माहितीतून स्फोटामागे इराण कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. 'हा स्फोट फक्त एक ट्रेलर आहे, असे पत्रात म्हटले आहे. भविष्यात आणखी हल्ले करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
दोन युवकांनी ठेवली स्फोटके -
पोलिसांना घटास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. कॅबमधून आलेल्या दोन युवकांनी स्फोटके ठेवल्याचे यात दिसत आहे. पोलिसांनी कॅब चालकाची चौकशी केली असून तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे या स्फोटाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. पथकाला घटनास्थळावरून एक पत्र मिळाले आहे. यामध्ये इस्राईलच्या राजदूताला धमकी देण्यात आली आहे. 'हा स्फोट फक्त एक ट्रेलर आहे, असे पत्रात म्हटले आहे. भविष्यात आणखी हल्ले करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
इराणच्या दोन अधिकाऱ्यांचा पत्रात उल्लेख आहे. इराणच्या कुड्स फोर्सचे जनरल कासिम सुलेमानी आणि वैज्ञानिक मोहसीन फखरिज्देह यांचा उल्लेख या पत्रात आहे. यातील जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात केली होती. तर मोहसीन त्यांची हत्या मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती.
पायी चालत जाऊन ठेवला बॉम्ब -
तपास करताना पोलिसांनी दूतावास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दोन युवक कॅबमधून येत असल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. स्फोट झाला त्या घटनास्थळावरून काही अंतर दूर ते उतरले. त्यानंतर काही अंतर पायी चालत त्यांनी स्फोटके ठेवली. पोलिसांनी कॅब चालकाचा शोध घेवून त्याची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
स्फोटानंतर गाड्यांच्या काचा फुटल्या -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात चार ते पाच गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. इस्राईलच्या दूतावासापासून १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन दलाचे पथक आणि दिल्ली पोलिसांचे काही वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
ठिकठिकाणी हाय अलर्ट जारी; दूतावासाची सुरक्षा वाढवली..
या स्फोटानंतर देशभरात ठिकठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि मुंबईमध्ये विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, इस्राईलच्या दूतावासाची सुरक्षाही वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे.