हैदराबाद- कोरोना महामारीच्या संकटात जशी माणुसकीचे उदाहरणे समोर येत आहेत. तशीच माणुसकी संपली आहे का, असा प्रश्न पडावा, अशा घटनाही समोर येत आहेत. कारमधून नेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू होताच टॅक्सी चालकाने मृतदेह व मृताच्या पत्नीला भररस्त्यात सोडले. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम येथील टेक्काली येथे ही घटना घडली आहे.
भररस्त्यात कार चालकाने सोडून दिल्याने महिलेवर अत्यंत दयनीय परिस्थिती ओढवली. तिला पतीच्या मृतदेहासह काही तास मदतीसाठी टेक्काली शहरातील रस्त्यावर वाट पाहावी लागली. ही घटना घडल्याचे माहिती होताच स्थानिक पोलीस निरीक्षक कामेश्वर राव हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची विचारपूस केली.
हेही वाचा-चिंताजनक..! नागपुरात प्रोटेस्टंट ख्रिश्चन बांधवांना दफनविधीची जागा पडत आहे अपुरी
पीडित महिला ही ओडिसामधील बालासोरे येथील रहिवाशी आहे. ती आजारी असलेल्या पती प्रदीप कुमार यांना हैदराबादहून भुवनेश्वरमधील रुग्णालयात नेत होती. मात्र, रस्त्यातच टेक्काली येथे महिलेच्या पतीचे टॅक्सीमध्ये निधन झाले. यावेळी टॅक्सी चालकाने महिलेला पतीच्या मृतदेहासह खाली उतरण्यास भाग पाडले.
हेही वाचा-ख्रिश्चन धर्मगुरुंकडून नियमांचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
पोलीस निरीक्षक कामेश्वर राव यांनी महिलेसाठी टॅक्सीची व्यवस्था केली. पोलिसांच्या मदतीने महिलेला टॅक्सीमधून पतीच्या मृतदेहासह ओडिशाला पाठविण्यात आले आहे.