नवी दिल्ली - कोव्हिक्सिनला आपत्कालीन वापर करण्याची परवानगी दिल्याने त्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाल्याचे मत काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केले आहे. कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झाली नाही. त्याचा वापर करणे म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होऊ शकत नाही. भारतीय हे गिनीपिंग नाहीत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी कोव्हॅक्सिनची परवानगी दिली आहे. मात्र, लाभार्थ्याला कोरोना लशीची निवड करता येत नसल्याचे सांगण्या येत आहे. तसेच प्रशासनाकडून देण्यात येणारी लस निवडण्यास सांगण्यात येत आहे. कोव्हॅक्सिनच्या तीन चाचण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे लशीच्या क्षमतेबाबत विविध चिंता व्यक्त होत आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, अशा पद्धतीने सरकारने वागणे आवश्यक आहे. कोव्हॅक्सीनची तिसऱ्या टप्प्यातील विश्वसनीय चाचणी होईपर्यंत सरकारने या लसीचा वापर करू नये.
कोव्हॅक्सिन सुरक्षित असल्याचा -बायोटेकसह नीती आयोगाचा दावा
कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकने आयसीएमआरबरोबर विकसित केलेली लस आहे. दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची हजारो लोकांवर चाचणी झाल्याचे म्हटले आहे. किरकोळ दुष्परिणाम असल्याचे पॉल यांनी म्हटले होते. दोन्ही लस परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचेही पॉल यांनी म्हटले होते. भारत बायोटेकनेही कोरोना लशीवरील सर्व आरोप फेटाळून लावत सविस्तर स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे.