दुर्गापूर (पश्चिम बंगाल) Indian Scientist Death : स्वीडनमध्ये एका ३२ वर्षीय भारतीय महिला शास्त्रज्ञाचा गूढ मृत्यू झालाय. रोशनी दास असं या महिला शास्त्रज्ञाचं नाव असून त्या पश्चिम बंगालमधील दुर्गापूरच्या रहिवासी आहेत.
अपार्टमेंटमध्ये मृतदेह सापडला : रोशनी दास यांच्या आईंच्या म्हणण्यानुसार, २९ सप्टेंबर रोजी त्याचं मुलीशी शेवटचं संभाषण झालं होतं. त्यानंतर त्यांचा रोशनीशी कोणताही संपर्क नव्हता. १२ ऑक्टोबर रोजी स्वीडनच्या दूतावासानं भारतीय दूतावासात जाऊन रोशनी यांचा मृतदेह त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सापडल्याची बातमी दिली. या प्रकरणी एका स्वीडिश नागरिकाला ताब्यात घेण्यात आलंय.
संशोधनासाठी स्वीडनला गेल्या होत्या : रोशनी यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. रोशनी दास या २०१८ मध्ये संशोधनासाठी स्वीडनला गेल्या होत्या. मात्र त्या वेळेत आपलं संशोधनं पूर्ण करू शकल्या नाही. त्यामुळे त्यांनी तिथेच काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 'रोशनीला काही दिवसांपूर्वी थोड्या पैशांची गरज होती. त्यानंतर मी ६ ऑक्टोबर रोजी तिला पैसे पाठवले होते, असं रोशनी दास यांच्या आई ममता दास यांनी सांगितलं.
आईची प्रतिक्रिया : ममता दास म्हणाल्या की, 'रोशनी मला नेहमी पैसे मिळाल्यानंतर कळवते. मात्र यावेळी तिच्याकडून कोणताही संपर्क झाला नाही. तिचे सर्व फोन नंबरही बंद होते. त्यानंतर आम्हाला तिच्या निधनाचीच बातमी मिळाली'. रोशनी यांच्या आईनं स्वीडिश सरकारला मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांना त्वरित अटक करण्याची आणि मुलीचा मृतदेह परत देण्याची मागणी केली आहे.
न्यूरोलॉजीच्या क्षेत्रात संशोधन सुरू होतं : रोशनी दास यांनी त्यांचं शालेय शिक्षण पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथून पूर्ण केलं होतं. वर्धमान राज महाविद्यालयातून प्राणीशास्त्रात ऑनर्स पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी भुवनेश्वर येथील कलिंगा विद्यापीठातून जैवतंत्रज्ञानाची पदवी घेतली. त्यानंतर त्या संशोधनासाठी स्वीडनमधील उमिया विद्यापीठात गेल्या. तिथे त्यांचं न्यूरोलॉजीच्या क्षेत्रातील पोस्टडॉक्टरल संशोधन अंतिम टप्प्यात होतं.
हेही वाचा :