नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची एकूण 62,480 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. पण या काळात कोरोना संसर्गामुळे 1,587 लोकांचा मृत्यूही झाला आहे.
कोरोनामधून बरे होणार्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 88,977 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,85,80,647 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे देशातील कोरोना रिकव्हरीचा दर वाढून 96.03 टक्के झाला आहे. तर मृत्यू दर हा 1.29 टक्के आहे. सक्रीय रुग्णाचा दर 2.68 टक्के एवढा आहे.
देशातील कोरोनाची स्थिती...
- एकूण कोरोना रुग्णांचा आकडा : 2,97,62,793
- कोरोनामुक्त रूग्ण : 2,85,80,647
- मृत्यू झालेल्याची संख्या : 3,83,490
- सक्रीय रुग्ण संख्या : 7,98,656
- एकूण लसीकरण : 26,89,60,399
नवीन रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण मृतांचा आकडा वाढत असून घाबरवणारा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, यूपीत कोरोना मृत्युंची संख्या अधिक आहे. तर नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. गुरुवारी 19,29,476 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 38,7167,696 चाचण्या पार पडल्या आहेत.
'डेल्टा व्हेरिएंट’ वर प्रभावी बूस्टर शॉट -
कोरोना विषाणू आपले रूप बदलत आहे. भारतात सापडलेला कोरोना ‘डेल्टा व्हेरिएंट’ हा चिंतेचा विषय बनला आहे. दुसर्या लाटेदरम्यान ‘डेल्टा व्हेरिएंट’मुळे रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्याही जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ‘डेल्टा व्हेरिएंट’ वर प्रभावी असा बूस्टर शॉट 'स्पूटनिक व्ही' आणणार आहे. हा बूस्टर शॉट कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’विरूद्ध काम करेल. स्पूटनिक व्हीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. भारतात सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ वर 'स्पूटनिक व्ही' अधिक प्रभावी आहे. डेल्टा प्रकार किंवा B1.617.2 स्ट्रेन हा भारतात पसरलेल्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं.