लखनौ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये १ फेब्रुवारीला होणार आहे.
लो-स्कोरिंग सामना : एक लो-स्कोरिंग सामनाही किती रोमहर्षक आणि अटीतटीचा असू शकतो, हे लखनौच्या मैदानात आज दिसून आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. ज्यात भारताने एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केल्यावर फलंदाजीत मात्र अखेपर्यंत सूर्यकुमार यादवने टिकून राहून नाबाद 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅप्टन हार्दिकनं नाबाद 15 धावांची साथ त्याला दिली.
भारताचा संघर्ष : भारताला विजयासाठी मिळालेले १०० धावांचे आव्हान हे मोठे नव्हते. पण भारताला शुभमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला. चौथ्या षटकात गिलला ब्रेसवेलने माघारी धाडले, त्याला यावेळी सात धावा करता आल्या. त्यानंतर इशान किशन आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानात होती. आक्रमक फटकेबाजी करणारा इशान किशन यावेळी संथपणे खेळत होता आणि याचाच फटका त्याला बसला. इशानला यावेळी ३२ चेंडूंचा सामना करताना १९ धावा करता आल्या. त्यावेळी भारताची २ बाद ४६ अशी स्थिती झाली होती.
हार्दिक पांड्याची रणनिती आली कामी : हार्दिक पंड्याने यावेळी चांगली रणनिती वापरली. खेळपट्टी फिरकीला पोषक होती. त्यामुळे हार्दिकने यावेळी वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना सुरुवातीला आक्रमण करायला आणले. हार्दिकही ही रणनीती यशस्वी ठरली. कारण या प्रत्येकाने प्रत्येकी एक विकेट मिळवली आणि न्यूझीलंडच्या संघाला पिछाडीवर ढकलले. या चौघांनी एकामागून एक न्यूझीलंडला धक्के दिले. त्यामुळे न्यूझीलंडने आपला अर्धा संघ ६० धावांत गमावला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ आता मोठी धावसंख्या उभारणार नाही, हे स्पष्ट झाले होते. पण भारतीय गोलंदाज फक्त तिथेच थांबले नाहीत तर त्यांनी त्यानंतरही आपला तिखट मारा सुरुच ठेवला.
हेही वाचा : Women U19 WC : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय, पहिल्याच टी२० विश्वचषकावर कोरले नाव