नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त केला आहे. भारताने गुरुवारी 100 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक आकडा पार केला. कोविडच्या विरोधात नऊ महिन्यातच ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्यावर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. ते सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आरोग्य सेवकांशी चर्चा करतील. त्याचवेळी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया लाल किल्ल्यावरून कैलाश खेर यांनी गायलेल्या ऑडिओ व्हिज्युअल चित्रपटाचे लोकार्पण करणार आहेत.
16 जानेवारीपासून सुरू झाली लसीकरण मोहीम -
देशात कोरोना लसीकरण मोहीम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरू केला. ऑक्सफोर्ड, अॅस्ट्राझेनेका आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोवाशील्डच्या आपत्कालीन वापरास सरकारने मंजुरी दिली होती. 18 सप्टेंबर रोजी देशभरात लसीचे 25 दशलक्ष डोस देण्यात आले. लस देण्यासाठी देशभरात 52,088 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 50,056 सरकारी केंद्रे आहेत, जिथे मोफत लस दिली जात आहे. तर 2,032 खाजगी आहेत.
लसीकरणात यूपी प्रथम क्रमांकावर, संपूर्ण डोसमध्ये महाराष्ट्र अव्वल
लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 12.21 कोटीहून अधिक लोकांनी येथे लस घेतली आहे. पूर्णपणे लसीकरण अर्थात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 78 लाख आहे. 9.32 कोटी लसीकरणाच्या डोजसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. येथे दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांची संख्या 2.88 कोटी आहे. पश्चिम बंगाल तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 6.85 कोटी डोज देण्यात आले आहेत. तर 1.87 कोटी लोकांनी दोन्ही डोज घेतले आहेत. गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे सुमारे 6.76 कोटी लोकांचे लसीचे डोज देण्यात आले. येथे 2.35 कोटी लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोज मिळाले आहेत. 6.72 कोटी लोकांना लसीकरण करून मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर आहे.
लसीकरणातील पहिले पाच राज्य -
- उत्तर प्रदेश - 12,21,40,914
- महाराष्ट्र - 9,32,00,708
- पश्चिम बंगाल - 6,85,12,932
- गुजरात - 6,76,67,900
- मध्य प्रदेश - 6,72,24,286
परदेशात लसीकरणाची काय आहे स्थिती -
डब्ल्यूएचओच्यानुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये लसीचे 221 दशलक्ष डोस दिले गेले आहेत. तेथील 47.5 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोज देऊन पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या 57% लोकसंख्येला दोन्ही डोज मिळाले आहेत. संपूर्ण लसीकरणात संयुक्त अरब अमिरात पहिल्या क्रमांकावर आहे. जपानच्या 65.8% लोकांचे आणि ब्रिटनमधील 67.3% नागरिकांचे दोन डोज पूर्ण झाले आहेत.
हेही वाचा - परमबीर सिंह यांच्या तथाकथीत वसूली प्रकरणी एका हवाला ऑपरेटरला गुजरातमधून अटक