रामपूर - शबनम हे असं नाव आहे, जे ऐकून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. शबनमने तिचा प्रियकर सलीमसाठी कुटुंबातील सात सदस्यांचा निर्घुण खून केला होता. तेव्हापासून शबनम रामपूर येथील जिल्हा कारागृहात बंद आहे. आता तिला लवकरच फाशी होणार आहे. दया याचिकेसाठी शबनमने राष्ट्रपती आणि राज्यपालांकडेही अर्ज केला होता. मात्र, तिचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आता मथुरा कारागृहात तिला कधीही फाशी दिली जाऊ शकते.
शबनम सध्या रामपूर जिल्हा कारागृहात मागील सव्वादोन वर्षांपासून बंद आहे. अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावातील ती रहिवासी आहे. १४ एप्रिल २००८ ला तिने प्रियकर सलीमसाठी घरातील सात सदस्यांची हत्या केली. तेव्हापासून सलीम आणि शबनम कारागृहात बंद होते. आता लवकरच दोघांना फाशी होणार आहे. उत्तर प्रदेशातील पहिल्या महिला तुरुंगात ही फाशी दिली जाणार आहे.
फाशीच्या जागेची जल्लादाने केली पाहणी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशीची शिक्षा दिली जात आहे. ही फाशी देण्याची तयारी मागील एक वर्षापासून सुरू आहे. मथुरा येथील तुरुंगात फाशी देण्यासाठी फाशीघर तयार करण्यात आले आहे. याची पाहणी पवन नामक जल्लादाने केली आहे. तोच शबनमला फाशी देणार आहे. मथुरा तुरुंगातील अधिकाऱ्यांनी अद्याप माझ्याशी संपर्क साधला नाही. मात्र, शबनमला फाशी देण्यात मी किंचितही मागे हटणार नाही. पुरुष असो किंवा महिला गुन्हेगाराला शिक्षा देणे एका जल्लादाचे कर्तव्य असते, असे पवन म्हणला.
प्रतिक्षा फक्त डेथ वॉरंटची
मथुरा तुरुंग प्रशासन सध्या शबनमच्या डेथ वॉरंटची वाट पाहत आहे. वॉरंट आल्यानंतर मथुरा कारागृह प्रशासनाने संपर्क केल्यास तत्काळ मथुरेला रवाना होईल, असे पवन म्हणाला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या महिलेला फाशी मिळण्याची ही पहिली वेळ आहे. सध्या तुरुंगातही फाशी देण्याची तयारी सुरू आहे.