वर्धमान (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला नर्सच्या नोकरीसाठी राज्य सरकारकडून नियुक्तीपत्र मिळाले. मात्र, ती आता नोकरीच्या निमित्ताने आपल्याला सोडून जाईल या भीतीने पतीने पत्नीचा हात कापल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
शेर मोहम्मद हा पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्रामचा रहिवासी असून त्याच्या पत्नीचे नाव रेणू खातून असे आहे. सर्वात वाईट म्हणजे, हल्ल्यानंतर तो सोमवारी सकाळी आपल्या पत्नीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेला. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, रेणू खातून नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. दुगरपूर औद्योगिक नगरातील एका खाजगी रुग्णालयात नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करत होती. नुकतेच तिला राज्य सरकारकडून नियुक्तीचे पत्र मिळाले होते.
शेर मोहम्मद स्वत: बेरोजगार असल्याने सरकारी नोकरी लागल्यावर पत्नी आपल्याला सोडून जाईल, अशी भीती त्याला वाटत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. रेणूचा मोठा भाऊ रिपन शेख याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, जेव्हापासून त्याच्या बहिणीला राज्य सरकारचे नियुक्तीपत्र मिळाले तेव्हापासून शेर मोहम्मद त्याच्या पत्नीवर नोकरी न करण्यासाठी दबाव आणत होता.
हेही वाचा - महाविकास आघाडीची बैठक संपली-चारही जागा निवडून आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन