कृषी कायद्यांबाबत सर्वाेच्य न्यायालयाच्या समितीची पहिली बैठक -
केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन दोन महिन्यांपासून सुरू ठेवले आहे. यावर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठित केली आहे. या समितीची पहिली बैठक २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यात कायद्याचे समर्थन व विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ५७ वा दिवस -
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज ५७ वा दिवस आहे. या कायद्याबाबत शेतकरी व सरकारमध्ये आतापर्यंत नऊ वेळा चर्चा झाल्या आहेत, मात्र यावर तोडगा अद्याप निघू शकलेला नाही.
बेस्टच्या खासगीकरणाबाबत आज पत्रकार परिषद -
बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने खासगी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट ४०० बसेस कंत्राटदारकडून घेणार आहे. त्यावर ड्रायव्हर आणि कंडक्टरही कंत्राटी असणार आहेत. याबाबत बेस्ट प्रशासनाने पत्रकार परिषद बोलावली आहे.
बेळगाव महापालिकेवर मोर्चा -
बेळगावच्या महापालिकेवर कन्नडिगांनी ध्वज फडकावल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुण्यात प्रबोधन महोत्सवाचे आयोजन -
पुण्यात प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर व मंत्री राजेंद्र यड्रावकर यावेळी उपस्थित असणार आहेत.
शालिनी ठाकरेंसह महिला नेत्यांच्या मुलाखती -
आजपासून सुरू होणाऱ्या प्रबोधन महोत्सवात सायंकाळी पाच वाजता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, मंत्री यशोमती ठाकूर, पंकजा मुंडे व शालिनी ठाकरे आदि महिला नेत्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता -
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ या महोत्सवाने उपलब्ध करून दिले आहे. १४ जानेवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचे आज सूप वाजणार आहेत.
गोव्यातील इफ्फी महोत्सवाचा आज सहावा दिवस -
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे आयोजन पणजी येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 16 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत सुरू राहील. यावेळी जगभरातील 224 चित्रपट या महोत्सवात सामील झाले आहेत.
सुशांतसिंह राजपूतचा जन्मदिवस -
१४ जून २०२० रोजी आत्महत्या केलेला अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा आज जन्मदिवस आहे. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला आदरांजली वाहिली आहे.
३५० स्टेशन मास्तरांचे उपोषण -
पुणे विभागातील ३५० स्टेशन मास्टर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय उपोषण करणार आहेत.