- 1) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 63 वा दिवस
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 63 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.
- 2) तांडव : दिग्दर्शकाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
'तांडव' वेब मालिकाचे दिग्दर्शक अली अब्बास झफर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत विविध राज्यांत दाखल केलेले फौजदारी गुन्हे रद्द करण्याची विनंती केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तांडव वेब मालिकेच्या दिग्दर्शकावर विविध राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- 3) ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’ पुस्तचाने मुख्यमंत्र्यांचे ह्सते आज प्रकाशन
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा साद्यंत आढावा घेऊन महाराष्ट्राची स्पष्ट भूमिका रोखठोकपणे मांडणाऱ्या ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
- 4) आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरु करण्यात येत आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
- 5) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज सभा
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज सभा होणार आहे. या सभेत कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावरून प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. तसेच पालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर, लसीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
- 6) पहिली स्वदेशी मेट्रो आज मुंबईतील चारकोप येथे दाखल होणार
आत्मनिर्भरतेचा नारा देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भविष्यात सर्व मेट्रो देशातच तयार करून घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशात तयार झालेली पहिली विनावाहक मेट्रोची देशात निर्मिती झाली आहे. ही मेट्रो आज मुंबईत दाखल होणार आहे.
- 7) प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस
श्रेयस तळपदे ‘इक्बाल’ मधून नावारूपास आला. त्यानंतर त्याने अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून विविधांगी भूमिका करत आपले चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान बनविले. ‘पोस्टर बॉईझ’ सारख्या सामाजिक समस्येवर आधारित विनोदी चित्रपटाची निर्मिती श्रेयस ने केली होती व त्याचा त्याच नावाचा बॉबी व सनी देओल अभिनित हिंदीत रिमेक बनविताना दिग्दर्शन क्षेत्रात पाऊलही टाकलं.
- 8) राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीत
शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थान यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. ग्रामस्थांना सुलभ दर्शन आणि मंदीर परिसरात जाणारे गेट नंबर तीन आणि चार भक्तांना खुले करण्याची मागणी होत आहे. तसेच आज राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत असून त्यांच्याशी चर्चा करुन ग्रामस्थ आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
- 9) औरंगाबादेत वंचित बहुजन मुस्लीम आघाडीच्यावतीने आज एकदिवसीय आंदोलन
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन मुस्लीम आघाडीच्यावतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजेपासून आंदोलन होईल.
- 10) मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सांगलीत निदर्शने
मराठा आरक्षणाबाबत चुकीचे व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सकाळी 11 वाजता सांगलीतील काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.