भोपाळ (मध्य प्रदेश) - आपल्या नवाबी थाटामुळे 'नवाबांचं शहर' अशी भोपाळची ओळख आहे. यासोबतच, तेथील हातमाग आणि हस्तकला महामंडळात बनवण्यात येणाऱ्या वस्तूही प्रसिद्ध आहेत. भोपाळच्या याच महामंडळाच्या एका पथकाने आता नवीन प्रकारच्या साड्या तयार केल्या आहेत. या साड्या केवळ सुंदर नाहीत, तर चक्क तुमच्या त्वचेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचंही काम करतात. औषधांमध्ये भिजवलेल्या कापडांपासून तयार करण्यात आलेल्या या साड्यांना 'आयुर्वस्त्र' असं नाव देण्यात आलंय.
पाण्याच्या वाफेवर प्रक्रिया -
हातमाग आणि हस्तकला विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार भोपाळच्या वस्त्रोद्योगाने शेकडो वर्ष जुन्या प्राचीन औषधी वनस्पतींच्या मसाल्यांचा वापर करत या साड्या तयार केल्या आहेत. या कपड्यांवर औषध असलेल्या पाण्याच्या वाफेवर ठेवून काही तास प्रक्रिया केली जाते. त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करणाऱ्या या साड्या तयार होतात. ही एक साडी बनवण्यासाठी सुमारे 5 ते 6 दिवस लागतात.
देशातील ३६ ठिकाणी विक्रीसाठी -
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विकसित करण्यात आलेल्या विशेष औषधी कपड्यांच्या आयुर्वस्त्र साड्या भोपाळ-इंदूरनंतर, देशातील ३६ मृगनयनी इम्पोरियम सेंटरमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातील. यापैकी 14 केंद्रे मध्य प्रदेशच्या बाहेर आहेत. मृगनयनीने लाँच केलेले आयुर्वस्त्र रोगप्रतिकारक आहेत. या कापडांची विक्री भोपाळपासून सुरू झाली. आता इंदूरमध्येही ते उपलब्ध करवून देण्यात आले आहे. लवकरच हे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पाठवण्यात येणार आहे.
साड्या कोरोनाकाळात उपयोगी -
मध्यप्रदेशच्या हातमाग आणि हस्तकला महामंडळाने हा नवीन प्रयोग केला आहे. बऱ्याच प्रक्रिया केल्यानंतर या साड्यांचे कापड तयार होते. या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या साडीमुळे लोकांच्या त्वचेची प्रतिकारशक्ती टिकून राहत असल्याचे म्हटले जात आहे. जर या साड्या सर्व प्रकारे जर यशस्वी ठरल्या, तर या साड्या विशेषत: कोरोना काळात रोगांपासून संरक्षण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतील.