नवी दिल्ली - कोरोनाचा देशात कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी रात्र-दिवस काम करत आहेत. तर दुसरीकडे रामदेव बाबा यांनी आपल्या वक्तव्यातून डॉक्टरांच्या भावना दुखवल्या आहेत. रुग्णांच्या मृत्यूला अॅलोपॅथीची औषधे जबाबदार असल्याचे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे. यामुळे असोसिएशन संतप्त असून रामदेव बाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयएमएने यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
बाबा रामदेव यांच्या विधानाचा भारतीय वैद्यकीय संघटनेचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी विरोध दर्शविला. कोरोना काळात केवळ भारतच नाही. तर जगभरातील कोट्यावधी लोक अॅलोपॅथी उपाचार पद्धतीमुळे कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण केवळ 3 टक्के आहे. या सर्व रूग्णांवर अलोपॅथीच्या औषधांवर उपचार सुरू आहेत. कधीकधी रुग्णाला ऑक्सिजनची गरज असते, तर कधी आयसीयू तर कधी व्हेंटिलेटरची. या सर्व सुविधा अॅलोपॅथी प्रणालीतच येतात, असे सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी म्हटलं.
कोरोना साथीच्या वेळी कमीतकमी 1200 ते 1300 डॉक्टरांचा मृत्यू झाला. या डॉक्टरांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्याऐवजी व त्यांच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी संपूर्ण अॅलोपॅथी प्रणालीवर प्रश्न उपस्थित करून त्यांनी चूक केली आहे. कोरोनावर रुग्णालयात नव्हे तर घरी उपचार केले जाऊ शकतात, असा संदेश त्यांच्या विधानातून जात आहे, असे लेले म्हणाले.
कोरोनावरील उपचारांबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी केल्या जात आहेत. सतत संशोधन चालू आहे. यावेळी कोणताही इलाज उपलब्ध नाही, कारण कोरोना हा एक नवा व्हायरस आहे. यापूर्वी याचा अभ्यास कधीच झाला नव्हता. औषधे बदलतच आहेत. परंतु या सर्व बाबींना वेगळी दिशा देताना योग गुरु रामदेव बाबांनी संपूर्ण अॅलोपॅथी प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबा रामदेव यांनी दिलेलं विधान खेदजनक आहे. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांना यासंदर्भात पत्र लिहले असून रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, असे डॉ. जयेश यांनी सांगितले.
काय म्हणाले रामदेव बाबा?
रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटलं. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्ये केले. उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथीउपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे.