पाटणा - आदर्श पती-पत्नी आणि त्यांच्या प्रेमाची अनेक प्रकरणे आपण वाचली असतील. मात्र बिहारमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका पतीने आपल्या पत्नीचे लग्न तीच्या प्रियकराशी लावून दिलं आहे. ही घटना बिहारच्या छपरामध्ये घडली.
छपरामधील रोजा मोहल्लामध्ये एका जोडप्याने प्रेमविवाह केला. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण होत होता. तो तीला मारहाण करायचा. यातच तरुणीला दुसऱ्या पुरुषाचा आधार मिळाला आणि तीला त्याच्यावर प्रेम झाले. आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषावर प्रेम झालं हे कळताच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा पत्नीने व्यक्त केली. सुरवातीला पतीने नकार दिला. मात्र, नंतर स्व:ताला सावरत त्याने पत्नीचे प्रियकरासोबत लग्न लावून दिले.
मी आनंदाने त्या दोघांचे लग्न लाऊन दिले. आमचाही प्रेमविवाह झाला होता. मात्र, तीला पुन्हा प्रेम झाले. मला काही समस्या नाही. आम्हाला एक मुलगी असून तीचा सांभाळ मी करणार आहे, अशी प्रतिक्रिया पतीने दिली आहे. निक्की असे तरुणीचे नाव आहे. तर प्रियकरासोबत लग्न झाल्याने निक्की आनंदी असून पूर्ण इमानदारीने हे नाते निभावणार असल्याची ग्वाही तीने दिली. तर पहिला पती लग्नानंतर खूप मारहाण करायचा, असेही तीने सांगितले.
जिकडे तिकडे लग्नाचीच चर्चा -
छपरामध्ये सध्या या लग्नाचीच चर्चा आहे. हिंदू विवाह कायद्यांअतंर्गत घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही. तर येथे पतीनेच आपल्या पत्नीचे प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे.