लखनऊ - दोन बायका आणि एक नवरा, त्या दोघींमध्ये नवऱ्याचे होणारे हाल आपण चित्रपटात पाहिले असतीलच. पण प्रत्यक्षात असं नातं असतं तेव्हा काय होतं? उत्तर प्रदेशच्या रामपुरमध्ये अशीच रंजक घटना समोर आली आहे. एका पतीला त्याच्या दोन पत्नींमध्ये रीतसर वाटलं गेलं आहे. पतीला आठवड्यात 3-3 दिवस आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरुन जडलेल्या प्रेमामुळे झालं आहे.
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर युवक आपल्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. यादरम्यान ही तरुणी गरोदर राहिली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला. मात्र, युवक आधीच विवाहित होता. गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी पत्नीकडे परतला. गरोदर राहिल्यानंतर गर्लफ्रेंड त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहचली. संपूर्ण गोंधळ उडाल्यानंतर युवकाच्या पत्नीने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. युवकानं आपल्या गर्लफ्रेंडसोबतही लग्न केले. मात्र, दोन बायका असल्याने तो कधी कोणासोबत राहणार असा प्रश्न निर्माण झाला. यावर त्याचे दोन पत्नींमध्ये रीतसर वाटप केलं आहे.
आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत. तर, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुसऱ्या पत्नीसोबत राहणार. रविवारी तो आपल्या आई-वडिलांसोबत राहिल, अशी युवकाची वाटणी करण्यात आली आहे.
युवकाचे नाव तकमील अहमद आहे. तो चंडीगढमध्ये काम करत होता. तेव्हा फेसबूकच्या माध्यमातून त्यांची एका तरुणीसोबत मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. युवती आसामवरून त्यांच्यासोबत राहण्यासाठी चंदीगढला पोहचली. ते दोघेही सोबत राहू लागले. मात्र, युवकाने तिला आपल्या पहिलेच लग्न झाल्याचे सांगितले नाही. यातच तरुणी गर्भवती झाली. तेव्हा युवकाने तिला आसामला पाठवून दिले आणि चंदीगढवरून रामपूरला परतला. तरुणीने आपल्यासोबत पुन्हा संपर्क साधू नये म्हणून फोन बंद केला. काही दिवसांनी तरुणीने बाळाला जन्म दिला. सध्या ते बाळ सहा महिन्यांचे आहे. तरुणीने त्याचा शोध घेतला आणि ती त्यांच्या गावापर्यंत पोहचली. आता ते दोघे सोबत राहणार आहेत. मात्र, यात विशेष म्हणजे तरुणाचे पहिले लग्नही प्रेमातूनच झाले होते. पहिले लग्न त्याने 3 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये केले होते.
जिल्हा प्रोबेशन ऑफिसर पल्लवी सिंह यांनी सांगितले की, या तरूणाने 3 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये पहिले लग्न केले होते. बंगळुरूमध्ये काम करत असताना त्याची ओळख मेसेंजरवर रुद्रपूर येथील एका मुलीशी मैत्री झाली. ती मुलगी रुद्रपूरहून बंगळुरूला पोहोचली आणि दोघांनी लग्न केले होते. आता त्याने पुन्हा दुसरे लग्न केले आहे.