अमृतसर : पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीने जोर पकडला असताना पंजाबमधून महत्त्वाची बातमी आहे. सुवर्ण मंदिराच्या दरबार साहिबजवळ शनिवारी रात्री मोठा स्फोट झाला. या स्फोटात काही लोक किरकोळ जखमीही झाले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रथमदर्शी हा बॉम्बस्फोट असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. जवळपासच्या रेस्टॉरंटमध्ये चिमणीचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अचानक स्फोट झाला. त्यांना आगीचा गोळा दिसला. यानंतर दगड व काचेचे तुकडे उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्याने अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
हा बॉम्बस्फोट नव्हता- तिथे बाहेरून आलेल्या यात्रेकरूंनी सांगितले की, अचानक मोठा स्फोट कधी झाला, हे समजले नाही. काही दगड येऊन आमच्यावर आदळले. दगड लागल्याने काही मुलीही जखमी झाल्या, असे त्यांनी सांगितले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर जोरदार ज्वाळा आणि धुराचे लोट उठू लागले. काय झाले हे समजले नाही. सिलिंडर फुटला असेल किंवा स्फोट झाला असेल हे आम्हाला समजत नाही. प्रत्यक्षात काय झाले, हे सांगणे कठीण आहे.
रेस्टॉरंटमधील चिमणीचा स्फोट- घटनास्थळी पोहोचलेले एसीपी पोलीस अधिकारी मीडियाला माहिती देताना म्हणाले की, कोणताही बॉम्बस्फोट झालेला नाही. दरबार साहिबच्या बाहेरील पार्किंगमध्ये मोठा आरसा लावण्यात आला होता, त्याचा स्फोट झाला. तपासादरम्यान बॉम्बस्फोटाशी संबंधित कोणतीही वस्तू घटनास्थळी सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, पार्किंगच्या शेजारी एक रेस्टॉरंट आहे, त्याची चिमणी खूप गरम असल्याने त्यात गॅस तयार झाला. त्यामुळे काच फुटली आणि त्याचा स्फोट झाला. लोकांनी घाबरण्यासारखे दुसरे काही नाही. अमृतसर येथील सुवर्णमंदिर हे शीख बांधवांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दर महिन्याला लाखो शीख बांधव जगभरातून भेट देत असतात. सुवर्णमंदिर हे प्रेक्षणीय स्थळ असल्याने जगभरातून पर्यटकदेखील या गुरुद्वाराला भेट देतात.