श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पूंछमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे एका दहशतवादी तळावर छापा मारुन ही कारवाई करण्यात आली.
पूंछमध्ये एका ठिकाणी दहशतवादी तळ असल्याची माहिती पोलिसांना आपल्या खबरीकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पूंछ पोलिसांच्या एका स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) ही कारवाई केली. एसएसपी डॉ. विनोद कुमार आणि डीएसपी मुनीश शर्मा यांनी या पथकाचे नेतृत्व केले. या पथकासोबतच लष्कराचे स्थानिक पथकही या कारवाईत सहभागी होते.
काही तास चाललेल्या या शोधमोहीमेनंतर एक एके-५६ रायफल, या रायफलीची एक मॅगझीन, एके रायफलीची ३० जिवंत काडतुसे, दोन चिनी बनावटीची पिस्तुले आणि एक पिस्तुल मॅगझीन जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : कुपवाडामध्ये दहशतावाद्याची मदत करणाऱ्या तरुणाला अटक; शस्त्रसाठा जप्त