रांची - भारत विरुद्ध न्यझिलंड टी 20 सामना रांचीतील झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (जेएससीए) मैदानावर 27 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. जेएससीएच्या वतीने सामन्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सामन्याच्या तिकीटविक्रीचा दरही जारी करण्यात आला आहे. तिकीटविक्री ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करण्यात येणार आहे. मात्र ऑनलाईन तिकिटाची होम डिलीव्हरी करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
वेस्टगेटच्या बाजूला 24, 26 जानेवारीला मिळणार तिकीट - रांचीमध्ये 27 जानेवारीला होणाऱ्या सामन्याची तिकीटविक्री मैदानाच्या वेस्टगेटच्या बाजूला करण्यात येईल. तिकीटांची विक्री 24 आणि 26 जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यामुळे रांचीतील क्रीडाप्रेमींना ही पर्वणीच आहे. दोन्ही संघाच्या सुरक्षेसाठी झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनने पूर्ण तयारी केली आहे.
ऑनलाईन तिकीटांची होम डिलीव्हरी - मागच्यावेळी रांचीत झालेल्या सामन्याच्यावेळी क्रीडाप्रेमींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपले तिकिटाबाबतचा क्यूआर कोड काऊंटरवर आणून दाखवावे लागत होते. त्यामुळे मैदानात खूप मोठी रांग लागली होती. त्यासह सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा मैदानावर तैनात करावा लागला होता. त्यामुळे ऑनलाईन तिकीट विक्री करताना कशी व्यवस्था असावी, यावर मंथन झाले. ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता लाईनमध्ये उभे रहावे लागणार नाही, तर तिकीट थेट घरी मिळणार आहे.
पोलिसांची अतिरिक्त कुमक होणार तैनात - रांचीत होणाऱ्या सामन्याच्यावेळी पोलीस दल कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे आगामी भारत न्यूझिलंड सामना, सरस्वती पूजन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर अतिरिक्त पोलीस कुमक पोलीस मुख्यालयाकडून मागवण्यात आली आहे. 24 जानेवारीपर्यंत ही अतिरिक्त कुमक रांचीत दाखल होण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त सीसीटीव्ही लागणार - आगामी भारत न्यूझिलंड सामना आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा चांगलाच तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. यासाठी वेगळे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. कंट्रोल रुम बनवण्यात येत आहे. कंट्रोल रुममध्ये 20 पेक्षा अधिक जवानांना तैनात करण्याची योजना बनवण्यात येत आहे. मैदानाच्या जवळ आणि आजूबाजुला सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात येत नाही.
भारत न्यूझिलंड सामन्याची तयारी सुरू - झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आयोजक समिती, जिल्हा प्रशासन आणि रांची पोलीस दलांमध्ये सारख्या बैठका सुरू आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू हे 25 जानेवारीला रांचीत पोहोचणार आहेत. त्यानंतर 26 जानेवारीला मैदानाचा अभ्यास या संघाककडून करण्यात येईल. खेळाडूंच्या हॉटेलपासून ते मैदानापर्यंतच्या सुरक्षेची सगळी योजना तयार करण्यात येत आहे. विमानतळ, हॉटेल ते मैदानापर्यंत किमान दोनहजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - India Open 2023 इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात, या दिग्गज खेळाडूंवर असेल सगळ्यांची नजर