मुंबई - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव azadi ka amrit mahotsav साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे विविध राज्यातील शहरांमध्ये हर घर तिरंगा मोहिम Har Ghar Tiranga Campaign मोठ्या उत्साहासात राबविली जात आहे स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या तमाम शूर वीरांना नमन करण्यासाठी देशभरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे असे असले तरी भारताचा स्वातंत्र्य इतिहास नेमका कसा आहे देशभर सुरु असलेला अमृत महोत्सवाचं महत्व काय आहे हर घर तिरंगा मोहिम नेमकी काय यांचा आढावा घेणारा रिपोर्ट
स्वातंत्र्याचा इतिहास : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पारतंत्र्याच्या बेड्या तोडत स्वतंत्र झाला होता. या दिवशी तमाम नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. या स्वातंत्र्यासाठी अनेक शूर विरांनी बलिदान दिले. आजच्या या दिवसी त्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास खूप संघर्षपूर्ण आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भाषण केले आणि आता भारत स्वतंत्र झाला अशी घोषणा केली. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास खूप मोठा आहे. इ.स. 1600 पासून वेगवेगळ्या पातळींवर अनेकांनी गुलामगिरीशी स्वतंत्रपणे लढा दिला. परंतु 1857 च्या विद्रोहानंतरच संपूर्ण भारताचा स्वातंत्र्यासाठी आवाज बुलंद झाला. स्वातंत्र्याचा हा विद्रोह शहीद मंगल पांडे यांनी पुकारला होता. 1857 च्या युद्धात मंगल पांडेची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. चरबी असलेले काडतुसे वापरण्यास मंगल पांडे यांनी असहमती दाखवली. ही कारतूसे आम्ही वापरू शकत नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे माडंली. कारण इंग्रजांनी भारतीय सैनिकांना ज्या रायफल्स दिल्या होत्या, त्यात वापरण्यात येणाऱ्या काडतुसमध्ये डुक्कर आणि गायींची चरबी वापरली जात होती. ही काडतुसे तोंडाने ओढून बाहेर काढावी लाग होती. असे करण्यास सैनिक तयार नव्हते आणि त्या सैनिकांचा आवाज मंगल पांडे बनले. मंगल पांडेच्या नेतृत्त्वात भारतीयांनी हे कारतुसे वापरणे हा धार्मिक भावनांचा अपमान असल्याचे म्हटले आणि त्याला विरोध सुरू केला. स्वातंत्र्यासाठी संघर्ष एवढा पेटला होती की क्रांतिकारकांना सतत फाशीच्या शिक्षा देऊनही क्रांतीची ज्योत मंदावली नाही. एक हुतात्मा झाला की दुसरा क्रांतीकारी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी सज्ज होता. परंतु एवढे असूनही इंग्रजांनी क्रूरता सोडली नाही. 13 एप्रिल 1919 ची भीषण घटना कोणीच विसरू शकत नाही. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर यांच्या आदेशानुसार जालियनवाला बाग हत्याकांड घडले. हजारो निरपराध नागरिकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि हजारो लोक मारले गेले. याच घटनेमुळे भगतसिंग आणि उधम सिंग सारखे क्रांतिकारक समोर आले. 1929 चे दिल्ली विधानसभा बॉम्बस्फोट, 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू झालेली असहकार चळवळ, 1922 ची चौरी-चौरा घटना, 1942 ची भारत छोडो चळवळ या सर्व चळवळींमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले.
अमृत महोत्सव : भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल. औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील. भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील ठाणे शहरात अमृत महोत्सवाची स्वतःची संकल्पना तयार केली आहे, जी १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. या उत्सवांमध्ये प्रत्येक राज्यातील विविध शहरात विविध कार्यक्रम, उत्सव, विविध रॅली, सामुदायिक कार्निव्हल इत्यादींचा समावेश आहे. ३१ जुलै २०२२ रोजी 'मन की बात' मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरमयान आपले सोशल मीडिया प्रोफाइल चित्र बदलून भारताच्या ध्वजासह लावण्याचे आवाहन केले आहे.
हर घर तिरंगा अभियान : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत हर घर तिरंगा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. २२ जुलै रोजी स्वतः मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेमुळे आमचा तिरंग्याशी संबंध अधिक दृढ होईल, असे पंतप्रधानांनी ट्विट केले. तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून २२ जुलै १९४७ रोजीच स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी लिहिले, 'यावर्षी 'आझादी का अमृत' उत्सव साजरा करत असताना 'हर घर तिरंगा' चळवळीला बळ देऊ या. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत तुमच्या घरांमध्ये तिरंगा फडकावा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात तिरंगा मोहीम १३ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणार आहे. या मोहिमेद्वारे सरकारने २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये सर्व खासगी आणि सरकारी आस्थापनांचाही सहभाग असेल.
तिरंगा फडकवण्याची नियमावली : तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो. तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे. फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये. ह्या नियमावली लक्षात असणे अत्यंत आवश्यक आहे.
तिरंगा झेंड्याचा इतिहास : गांधीजींना 1921 मध्ये आंध्रप्रदेशमधील पिंगली व्यंकय्या भेटले. पिंगली व्यंकय्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये क्रांतिकारी होते. गांधीजींनी सांगितले ध्वज असा बनवा ज्यामध्ये संपूर्ण भारताचे चित्रण दिसले पाहिजे. त्या नंतर पिंगली व्यंकय्या यांनी संपूर्ण देशाचे झेंडे पाहून त्यांनी एक झेंडा तयार केला. या ध्वजामध्ये दोन रंगाच्या पट्ट्यांचा समावेश केला होता. ज्यामध्ये वरती हिरवा खाली लाल रंगाच्या पट्टीचा समावेश होता आणि मधे एक चकरा दर्शविला होता. या ध्वज्यामध्ये ही सुधारणा करून 22 जुले 1947 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली विधान सभेची एक बैठक झाली. ज्यामध्ये हा आपला तिरंगा राष्ट्रीय ध्वज मानून घोषित केला. आपल्या तिरंग्याची व्याख्या ही धर्मनिरपेक्षता ठेवण्यात आली. ज्यामध्ये वरील केसरी रंग देशाची शक्ती दर्शवितो. मधे पांढरा रंग सत्य व शांती दर्शवितो आणि हिरवा रंग भारतातील कृषी, हिरवळता दर्शवितो आणि मध्ये सम्राट अशोकाचे चक्र हे कायद्याचे चक्र म्हणून दर्शविले आहे.
हेही वाचा - Independence Day 14 ऑगस्ट 1947 च्या आठवणींना दिला महाजनांनी उजाळा